उपनगरीय रेल्वेचा प्रवास दिसणार ‘बीबीसी’वर
By Admin | Updated: September 26, 2014 03:20 IST2014-09-26T03:20:53+5:302014-09-26T03:20:53+5:30
कुलाबा ते ठाणे धावलेली पहिली ट्रेन, सीएसटी सारखे असलेली वर्ल्ड हेरिटेज वास्तू आणि आता वाढलेला उपनगरीय रेल्वेचा पसारा.
_ns.jpg)
उपनगरीय रेल्वेचा प्रवास दिसणार ‘बीबीसी’वर
मुंबई : कुलाबा ते ठाणे धावलेली पहिली ट्रेन, सीएसटी सारखे असलेली वर्ल्ड हेरिटेज वास्तू आणि आता वाढलेला उपनगरीय रेल्वेचा पसारा. ब्रिटीश ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशन म्हणजेच बीबीसी या जगभरात दिसणाऱ्या टेलिव्हीजनवर मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा दिसणार आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वेवर बीबीसीकडून माहीतीपट बनवण्यात येणार असून मध्य रेल्वे मार्गावर नोव्हेंबर महिन्यात चित्रीकरण केले जाणार आहे. मार्च किंवा एप्रिल महिन्यात बीबीसीवर माहीतीपट प्रसारीत केले जाईल.
१८५३ साली पहिली ट्रेन मध्य रेल्वे मार्गावरुन धावली आणि त्यानंतर मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेचा पसारा हळूहळू वाढत गेला. इंग्रजांच्या काळात बनलेल्या मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या सीएसटीमधूनच रेल्वेच्या कामाचा गाडा हाकला जात होता. तो आजही याच मुख्यालयातून सुरुच आहे. अशा या वास्तूला आता वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा प्राप्त झाला आहे. या वास्तूला अनेक परदेशी पर्यटकही भेट देतात आणि आपल्या कॅमेऱ्यात या वास्तूला टिपतात. या वास्तूबरोबरच परदेशी पर्यटकांना हेवा वाटतो तो शहर आणि उपनगरात परसलेल्या लोकलचा. सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरुन ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. तर एकट्या मध्य रेल्वेवरुन जवळपास ४२ ते ४५ लाख प्रवासी प्रवास करतात. जवळपास दीड हजार लोकल फेऱ्यांतून हा प्रवास होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. मोठ्या प्रमाणात पसरलेल्या रेल्वेचा हा पसारा चित्रीत करण्यासाठी ‘बीबीसी’ने ठरविले असून त्याचे चित्रीकरण नोव्हेंबर महिन्यात केले जाणार आहे. यासाठी बीबीसीच्या पाच टिम मुंबईत येणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेन्द्र पाटील यांनी सांगितले. मार्च किंवा एप्रिल महिन्यात बीबीसीवर प्रसारीत केली जाणार आहे. त्याचे चार भाग प्रसारीत होणार असून प्रत्येक भाग एक तासांचा असणार असल्याचे
सांगितले. (प्रतिनिधी)