कोकणवासीयांचा प्रवास लांबला
By Admin | Updated: August 28, 2014 03:14 IST2014-08-28T03:14:57+5:302014-08-28T03:14:57+5:30
मालगाडीचे डबे करंजाडीजवळ घसरल्यानंतर गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसमोर सलग चौथ्या दिवशीही विघ्न आले

कोकणवासीयांचा प्रवास लांबला
मुंबई/डोंबिवली : मालगाडीचे डबे करंजाडीजवळ घसरल्यानंतर गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसमोर सलग चौथ्या दिवशीही विघ्न आले. करंजाडीजवळ धीम्या गतीने सुरू असलेल्या कामामुळे मध्य आणि कोकण रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या पाच ते सहा तास उशिराने धावत होत्या आणि त्यामुळे कोकणवासीयांचा प्रवास लांबत होता. त्याचा फटका चाकरमान्यांना बसत असल्याने स्थानकांबरोबरच ट्रेनलाही प्रचंड गर्दी होऊ लागली आणि या गर्दीमुळे काही ठिकाणी प्रवाशांचा उद्रेक पाहण्यास मिळाला. गुरुवारीही थोड्या प्रमाणात ट्रेन उशिराने धावू शकतात, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
२४ आॅगस्ट रोजी वीर ते करंजाडीजवळ मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले आणि या मार्गावरून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या वाहतुकीला मोठा फटका बसण्यास सुरुवात झाली. या परिसरात ५00 मीटरपर्यंत रेल्वे ट्रॅकला मोठा फटका बसल्याने ट्रॅक, स्लीपर आणि सिग्नल यंत्रणेचे काम हाती घेण्यात आले. हे काम हाती घेतानाच रेल्वे सेवा सुरूच ठेवण्यात आली.
मात्र दुरुस्ती कामामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांंना फटका बसतच गेला. सोमवार आणि मंगळवारी या मार्गावरील ट्रेन तब्बल दहा तास उशिराने धावत असतानाच बुधवारी या मार्गावरील ट्रेन सुरळीत होतील, असे कोकण रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र बुधवारीही जैसे थे परिस्थिती दिसून आली.
कोकण मार्गावरील ट्रेन अनियोजित वेळेनुसार धावत असल्याने काही स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली. ज्या गाड्यांचे आरक्षण प्रवाशांनी केले होते त्यांना तर प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला. आरक्षित डब्यात अनारक्षित प्रवाशांकडून जागा अडवण्यात येत होत्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये वादविवाद होत होते. ट्रेनच्या वेळेत बदल करण्यात आल्यामुळे अनेक ट्रेन पाच ते सहा तास उशिराने धावत होत्या. कोकणकन्या, राज्यराणी, सीएसटी ते करमाळी, सीएसट-मडगाव, मांडवी, मेंगलोर यासह अनेक गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या होत्या. (प्रतिनिधी)