विरोधी पक्षांच्या संयुक्त संघर्ष यात्रेला चंद्रपुरातून सुरुवात
By Admin | Updated: March 29, 2017 18:33 IST2017-03-29T18:33:47+5:302017-03-29T18:33:47+5:30
राज्यातल्या भाजपा-शिवसेना सरकारला संवेदना राहिल्या नसून हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे.

विरोधी पक्षांच्या संयुक्त संघर्ष यात्रेला चंद्रपुरातून सुरुवात
ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि. 29 - राज्यातल्या भाजपा-शिवसेना सरकारला संवेदना राहिल्या नसून हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. या सरकारविरोधात सुरू झालेला हा संघर्ष कर्जमाफी घेतल्याशिवाय थांबणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.
सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर येथे संघर्ष यात्रेच्या शुभारंभाच्या जाहीर सभेत बोलताना खा. अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. चव्हाण म्हणाले की, ९ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या तरी हे सरकार कर्जमाफी करत नाही. या सरकारमध्ये संवेदनाच राहिल्या नाहीत. मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळी कर्जमाफीबाबत निर्णय घेऊ, यांची योग्य वेळ येणार नाही. हे पुढच्या निवडणुकीत पुन्हा कर्जमाफीचे आश्वासन देतील, आम्हाला शेतक-यांच्या अडचणींची जाणीव होती म्हणून आम्ही देशातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. या सरकारमध्ये संवेदना आणि निर्णयक्षमता नाही. त्यामुळे कर्जमाफी मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले.
यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आम्ही पोकळ गप्पा मारत नाही. आम्ही कर्जमाफी करून दाखवली. हे सरकार निर्दयी आहे, त्यामुळे संघर्ष आणखी तीव्र करावा लागेल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. सरकार वाचवण्यासाठी 19 आमदारांचे निलंबन करून सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे. न्याय मागणा-या शेतक-यांना मंत्रालयात मारहाण केली जात आहे. शेतक-यांसाठी कर्जमाफी मागणे हा दोष आहे का? असा सवाल त्यांनी केला. याच सभेत बोलताना पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे म्हणाले की, आमदारांचे निलंबन म्हणजे शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. सरकार निर्लज्ज असून पेटून उठलेले शेतकरी हे सरकार भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तर आमदार विजय वडेट्टीवार यांनी, एकाही शेतक-याने कर्ज भरू नये, असे आवाहन केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील पळसगाव जाट येथील आत्महत्या केलेले शेतकरी बंडू करकाडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्ष, शेकाप, एमआयएम या सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संघर्ष यात्रेला सुरुवात केली. करकाडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास आजपर्यंत सरकारच्या एकाही मंत्र्याला वेळ मिळाला नाही. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी करकाडे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तसेच करकाडे यांचे कर्ज फेडण्याचे आश्वासन दिले. या संघर्ष यात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, शेकापचे धैर्यशील पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, जयदत्त क्षीरसागर, राजेश टोपे, मधुकर चव्हाण, बसवराज पाटील यांच्यासह विरोधी पक्षांचे आमदार उपस्थित होते.