चुकीने निवृत्त केलेल्या फौजदारास नोकरी
By Admin | Updated: August 12, 2015 02:45 IST2015-08-12T02:45:58+5:302015-08-12T02:45:58+5:30
सुमारे ३३ वर्षांपूर्वी नोकरी सुरु केली तेव्हाच सेवापुस्तकात नोंदल्या गेलेल्या चुकीच्या जन्मतारखेच्या आधारे नियत वयोमानाच्या आधीच निवृत्त केल्या गेलेल्या एका सहाय्यक पोलीस

चुकीने निवृत्त केलेल्या फौजदारास नोकरी
मुंबई : सुमारे ३३ वर्षांपूर्वी नोकरी सुरु केली तेव्हाच सेवापुस्तकात नोंदल्या गेलेल्या चुकीच्या जन्मतारखेच्या आधारे नियत वयोमानाच्या आधीच निवृत्त केल्या गेलेल्या एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास पुन्हा नोकरीत रुजू करून घेण्याचा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) दिला आहे.
मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मोटार वाहतूक विभागाच्या उपायुक्त कार्यालयात नियुक्तीवर राहिलेले सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गणपत साळुंके यांची खरी जन्मतारीख २६ सप्टेंबर १९६० असूनही कार्यालयाने चूक करून सेवापुस्तकात त्यांची जन्मतारीख २६ सप्टेंबर १९५६ अशी नोंदली होती. खरे तर ५८ वर्षे पूर्ण होऊन साळुंके १ आॅक्टोबर २०१८पासून सेवानिवृत्त व्हायला हवे होते. परंतु चुकीच्या जन्मतारखेच्या आधारे त्यांना चार वर्षे आधीच म्हणजे १ आॅक्टोबर २०१४पासून निवृत्त केले गेले.
याविरुद्ध साळुंके यांनी केलेली याचिका मंजूर करून ‘मॅट’चे न्यायिक सदस्य आर. बी. मलिक यांनी असा आदेश दिला की, साळुंके यांच्या सेवापुस्तकात २६ सप्टेंबर १९६० ही त्यांची खरी जन्मतारीख नोंदवून त्यांना पुन्हा नोकरीत रुजू करून घ्यावे.तसेच जन्मतारीखेची चुकीची नोंद आणि त्यामुळे मुदतीआधीच सेवानिवृत्ती यास पोलीस आयुक्त कार्यालयच पूर्णपणे जबाबदार असल्याने साळुंके यांना ज्या दिवशी चुकीने निवृत्त केले.तेव्हापासून पुन्हा कामावर घेईपर्यंतचा सर्व पगार व सेवासातत्याचे अन्य लाभही द्यावेत, असाही आदेश ‘मॅट’ने दिला.
सेवापुस्तकात जन्मतारीख चुकीची लागली असेल तर त्यात दुरुस्तीसाठी अर्ज नोकरीला लागल्यापासून पाच वर्षांतच केला जाऊ शकतो इथपासून ते साळÞुंके निवृत्तीच्या तोंडावर जन्मतारखेचा वाद घालून सेवाकाळ लांबवू पाहात आहेत असे मुद्दे मांडून सरकारी वकील के. बी भिसे यांनी याचिकेस विरोध केला. परंतु साळुंके यांचे वकील अॅड. अरविंद बांदिवडेकर यांनी आयुक्तालयातील रेकॉर्डच्याच आधारे असे दाखवून दिले की, मुळात चुकीच्या जन्मतारखेची नोंद होणे व इतकी वर्षे ती बदलली न जाणे यात साळुंके यांचा काहीच दोष नाही. शिवाय त्यांनी लबाडी किंवा फसवणूक केली, असेही दिसत नाही. सरकार स्वत:च्या चुकीचे खापर कर्मचाऱ्याच्या डोक्यावर फोडून त्याच्यावर अशाप्रकारे अन्याय करू शकत नाही. (विशेष प्रतिनिधी)
वयाच्या ५व्या वर्षी नोकरी!
या प्रकरणात आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मोठा हास्यास्पद घोळ घालून ठेवला होता. अमृतनगर, घाटकोपर येथे राहणारे साळुंके १९८१ मध्ये पोलीस शिपाई म्हणून नोकरीस लागले तेव्हा सुरुवातीस त्यांची जन्मतारीख २६ सप्टेंबर १९७६ अशी नोेंदली गेली होती. अर्थात वयाच्या पाचव्या वर्षी कोणी नोकरीस लागू शकत नाही हे उघड असल्याने ही तारीख बदलून २५ सप्टेंबर १९५६अशी नोंदली गेली. मजेची गोष्ट अशी की साळुंके यांनी आपली जन्मतारीख ही आहे, असा कधीज दावा केला नव्हता. उलट त्यांनी २५ सप्टेंबर १९६० या जन्मतारखेची कागदपत्रे सादर केली होती व ती फाईलमध्येही आहेत. सरकारी वकील भिसे यांनी न्यायालयात आलेल्या अधिकाऱ्यांच्या मदतीने साळुंके यांचे सेवापुस्तक बारकाईने पाहिले व त्यात साळुंके यांची जन्मतारीख २६ सप्टेंबर १९५६ असल्याचे दाखविणारा एकही कागद नाही, हे त्यांना मान्य करावे लागले. तरीही त्यांनी शेवटपर्यंत ही काल्पनिक जन्मतारीखच बरोबर असल्याचे जोरदार समर्र्थन केले!