पोलीस पाल्यांसाठी शनिवारी ‘जॉब फेअर’

By Admin | Updated: March 1, 2017 03:46 IST2017-03-01T03:46:56+5:302017-03-01T03:46:56+5:30

पोलीस कर्मचाऱ्यांच्या नातलगांचा रोजगाराचा प्रश्न सुटावा, यासाठी शनिवारी, ४ मार्च रोजी ठाण्यात जॉब फेअरचे (रोजगार मेळावा) आयोजन करण्यात आले

Job Fair on Saturday for the Police | पोलीस पाल्यांसाठी शनिवारी ‘जॉब फेअर’

पोलीस पाल्यांसाठी शनिवारी ‘जॉब फेअर’


ठाणे : पोलीस कर्मचाऱ्यांच्या नातलगांचा रोजगाराचा प्रश्न सुटावा, यासाठी शनिवारी, ४ मार्च रोजी ठाण्यात जॉब फेअरचे (रोजगार मेळावा) आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात एकाच छताखाली जवळपास ५0 कंपन्यांचे प्रतिनिधी येणार असून, यानिमित्ताने नोकरीच्या शेकडो संधी उपलब्ध होणार आहेत.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयामार्फत नोकरी सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. या सेंटरमार्फत पोलिसांच्या गरजू पाल्यांना नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असून, या प्रयत्नांना चांगले यशही मिळत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून ४ मार्च रोजी सिद्धी हॉलमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यासाठी पोलीस आयुक्तालयामार्फत टाटा, रिलायन्स आणि गोदरेजसारख्या जवळपास ५0 कंपन्यांशी संपर्क साधण्यात आला होता. त्यापैकी ३७ कंपन्यांनी होकार कळविला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेस अतिरिक्त आयुक्त यशस्वी यादव यांच्यासह इतर अधिकारीही उपस्थित होते.
(प्रतिनिधी)
।नातलगांच्या पाल्यांनाही मिळणार संधी
रोजगार मेळाव्याचे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉ. परमबीर सिंग यांच्यासह कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांच्या हस्ते होणार आहे. आयुक्तालय व कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे एफ. घीवाला या मानव संसाधन सल्लागार संस्थेच्या सहकार्याने हा मेळावा होत आहे.इयत्ता ८ वी उत्तीर्णपासून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना येथे संधी मिळणार आहे. पोलिसांच्या नातलगांच्या पाल्यांनाही संधी दिली जाणार आहे.

Web Title: Job Fair on Saturday for the Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.