जेएनपीटीच देशातील सर्वोत्तम बंदर !
By Admin | Updated: July 23, 2016 03:00 IST2016-07-23T03:00:56+5:302016-07-23T03:00:56+5:30
येत्या चार वर्षांत नव्याने तयार होत असलेल्या चौथ्या बंदराला आवश्यक असलेल्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी जेएनपीटी प्रशासनाने सुरुवात केली

जेएनपीटीच देशातील सर्वोत्तम बंदर !
उरण : जेएनपीटीअंतर्गत येणारे बंदर आणि येत्या चार वर्षांत नव्याने तयार होत असलेल्या चौथ्या बंदराला आवश्यक असलेल्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी जेएनपीटी प्रशासनाने सुरुवात केली आहे. यासाठी लागणाऱ्या आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात देशातील सर्वोत्तम बंदर म्हणून जेएनपीटी नावारुपाला येईल, असा दृढ विश्वास अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेतून व्यक्त केला.
जागतिक स्तरावर व्यापारवाढीसाठी जेएनपीटी बंदरात पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. त्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने रस्ते रुंदीकरणाचा समावेश आहे. जेएनपीटी बंदरातून सुलभपणे कंटेनर मालाची वाहतूक करण्यासाठी, चौपदरी रस्ते सहा ते आठ पदरी केले जाणार आहेत. जेएनपीटी, राष्ट्रीय महामार्ग, सिडको यांच्यासमवेत जेएनपीटी पोर्ट रोड कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. समुद्रामार्गे जलद मालवाहतूक करण्यासाठी ३४ किमीपर्यंत समुद्र चॅनेलची खोली १५ मीटरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. यासाठी २०२९ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या महत्त्वाच्या टप्प्यातील रेल्वेमार्गाला प्रारंभ करण्यात आला आहे.
दुसऱ्या टप्प्यात वडोदरा ते जेएनपीटीची रेल्वे मार्ग उभारणीला सुरुवात केली जाणार असून यासाठी २०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. कंटेनर मालाच्या आयात- निर्यातीसाठी ६०० कोटी खर्चाची ३३० मीटर अतिरिक्त कंटेनर जेट्टी, डीबीएफओटी धर्तीवर ७९६ कोटीची अतिरिक्त तरल पदार्थ हाताळणीसाठी टर्मिनलचे काम करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने देशात पहिल्यांदाच सॅटेलाईट पोर्टची हाताळणी केली जाणार आहे. ९१६७ कोटी खर्चाचा हा प्रकल्प ठाणे जिल्ह्यातील डहाणूनजीकच्या वाधवान येथे उभारला जाणार असून हा प्रकल्प २०२३ सालापर्यंत कार्यान्वित होईल. शेतकरी आणि उद्योजकांना मालाची वाहतूक सहजरित्या बंदरापर्यंत करण्यासाठी जेएनपीटी राज्यातील जालना व वर्धा येथे ड्रायपोर्ट उभारण्याची योजनाही तयार करण्यात आली होती. ४०० कोटी खर्चाच्या योजनेंतर्गत जालना येथे १८५ तर वर्धा येथे १६० हेक्टरमध्ये वेअर हाऊसची उभारणीही केली जाणार आहे. मेक इन इंडियासाठी जेएनपीटीने पुढाकार घेतला आहे. मल्टी प्रोडक्ट पोर्ट बेसवर जेएनपीटी परिसरात ईसीझेड उभारण्यात येणार आहे.
४ हजार कोटी खर्चाचा हा ईसीझेड २७७ हेक्टर जागेत उभारण्यात येणार असून त्याच्या पायाभूत सोयी-सुविधांवरच ४८६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या ईसीझेडमुळे दीड लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
जेएनपीटीतील व्यापार वृद्धीसाठी आयात निर्यातदारांचा वेळ, पैसा वाया जावू नये यासाठी ई-चलन सुविधा, आॅनलाइन कंटेनर टॅग सिस्टीम, ४५ हेक्टर क्षेत्रात कंटेनर वाहन चालक आणि व्यापाऱ्यांसाठी हॉटेल्स, लॉजिंग, बोर्डिंगची सुविधाही पुरवण्याचा निर्णय जेएनपीटीने घेतला आहे. बंदरात दोनच स्कॅनर मशीन उपलब्ध असल्याने फक्त पाच टक्केच कंटेनरचीच तपासणी होते. यामुळे आणखी दोन स्कॅनर वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचा इरादाही जेएनपीटी अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के भूखंड वाटपाबाबतही जेएनपीटी ठाम आहे. येत्या काही महिन्यातच प्रलंबित प्रश्न निकालात काढला जाईल, असा विश्वासही डिग्गीकर यांनी व्यक्त केला.
>जेएनपीटी बंदराच्या व्यापारात १२ टक्क्यांनी वाढ झाली. चौथ्या बंदरामुळे जेएनपीटी बंदराची कंटेनर हाताळणीची क्षमता दुपटीने वाढणार आहे. देशातील नंबर वन पोर्ट असलेले जेएनपीटी बंदर कामगार, अधिकाऱ्यांच्या श्रमाच्या बळावर आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांमुळे जगातील बंदरांमध्ये पाचव्या स्थानापर्यंत झेप घेईल.
- अनिल डिग्गीकर,
अध्यक्ष, जेएनपीटी.