झुलला बाई रामझुला...

By Admin | Updated: December 8, 2014 01:01 IST2014-12-08T01:01:01+5:302014-12-08T01:01:01+5:30

गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने नागरिकांना झुलवत असलेल्या रामझुल्याचा वनवास अखेर रविवारी संपला. रामझुल्याच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

Jhulla Bai Ramjula ... | झुलला बाई रामझुला...

झुलला बाई रामझुला...

उद्घाटन : अखेर १५ वर्षांचा वनवास संपला
नागपूर : गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने नागरिकांना झुलवत असलेल्या रामझुल्याचा वनवास अखेर रविवारी संपला. रामझुल्याच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. नागपूरचा चेहरामोहरा बदलणार, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुंबई येथील वांद्रे-वरळी समुद्रसेतूनंतर ‘केबल’च्या आधाराने बनलेला रामझुला हा राज्यातील एकमेव पूल आहे, हे विशेष.
राज्यातील नवीन सरकार येत्या पाच वर्षांत नागपूरचा चेहरामोहरा बदलून टाकेल. मागेल त्यापेक्षा जास्त या शहराला मिळेल. नागपूरने आता मागे वळून पाहण्याची आवश्यकता नाही. येथील इतर विकास कामे लवकर मार्गी लागावीत यासाठी महानगरपालिकेला १०० कोटी रुपये देण्याची गरज आहे व त्याची फाईल तयार झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूर सुधार प्रन्यासकडे ८०० कोटींच्या ठेवी आहेत. यावर व्याज खाण्याचे दिवस गेले असून हे पैसे नागपूरच्या विकासासाठी लावण्याची गरज आहे. शिवाय ‘एलबीटी’ लवकरच रद्द करणार असून नवीन पर्यायामुळे महानगरपालिकेला योग्य अनुदान मिळेल, असेदेखील ते म्हणाले.
भूमिपूजनही युती सरकारच्याच काळात
‘एमएसआरडीसी’ने (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) हा पूल बांधला आहे. परंतु सध्या महामंडळाची आर्थिक स्थिती खालावली आहे. याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे. या पुलाचे भूमिपूजन युती सरकारच्या काळात झाले होते व उद्घाटनदेखील युती सरकारच्याच काळात झाले, असे गडकरी म्हणाले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, ‘एमएसआरडीसी’चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, महापौर प्रवीण दटके, महानगरपालिका आयुक्त श्याम वर्धने, पोलीस आयुक्त के.के. पाठक हे प्रामुख्याने उपस्थित होते. नागरिकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हा उड्डाणपूल लगेच रहदारीसाठी मोकळा करण्यात येईल, अशी घोषणा अधिकाऱ्यांनी केली.(प्रतिनिधी).

Web Title: Jhulla Bai Ramjula ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.