‘जेट’ने केली क्षमतेपेक्षा जास्त तिकीट विक्री
By Admin | Updated: May 27, 2015 01:42 IST2015-05-27T01:42:35+5:302015-05-27T01:42:35+5:30
जेट एअरवेजने नागपुरात मात्र विमानाच्या क्षमतेपेक्षा जास्तीची तिकिटे विकली आणि प्रवाशांना ‘अॅडजेस्ट’ करण्याच्या नावाखाली अर्धा तास विमान लेट केले.

‘जेट’ने केली क्षमतेपेक्षा जास्त तिकीट विक्री
मुंबई : एकीकडे रिपाइं नेते रामदास आठवले यांना पाच मिनिटे उशीर झाल्याचे कारण सांगत बोर्डिंग केलेले असताना विमान प्रवास नाकारणाऱ्या जेट एअरवेजने नागपुरात मात्र विमानाच्या क्षमतेपेक्षा जास्तीची तिकिटे विकली आणि प्रवाशांना ‘अॅडजेस्ट’ करण्याच्या नावाखाली अर्धा तास विमान लेट केले.
नागपूरहून जेट ९ डब्ल्यू ७००५ चे विमान सकाळी ११ वाजता मुंबईला निघाले होते. या विमानाची इकॉनॉमी क्लासची जास्तीची तिकिटे विकली गेली. जास्तीच्या प्रवाशांना कसे सामावून घ्यायचे, असा प्रश्न जेटच्या लोकांना पडला. बिझनेस क्लासमध्ये फक्त एकच तिकीट विकले गेले होते. बाकीच्या जागा रिकाम्या होत्या. त्या जागी काही प्रवाशांनी बसावे यासाठी प्रयत्न सुरू झाले. तेदेखील जास्तीचे पैसे देऊन! प्रवाशांत माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक होते. त्यांना विचारले गेले. त्यांनी नकार दिल्यानंतर नागपूरचे साहा. पोलीस आयुक्त राजवर्धन यांनाही विचारणा झाली तेव्हा त्यांनीही नकार दिला.
दरम्यान, जे प्रवासी विमानात बसले होते ते उकाड्याने हैराण झाले होते कारण एसीही चालू केलेला नव्हता. या सगळ्या नाट्यात अर्धा तास गेला आणि ११ चे विमान साडेअकरानंतर उडाले. त्यामुळे प्रवाशांमध्ये जेटच्या व्यवस्थापनाबद्दल संताप व्यक्त होत होता. क्षमतेपेक्षा जास्त तिकिटे कशी विकली जातात, याची विमान पत्तन प्राधिकरणाने चौकशी करावी, अशी मागणीही प्रवाशांनी केली. (प्रतिनिधी)