जेजुरीगडाची सुरक्षाव्यवस्था ‘खंडोबाभरोसे’
By Admin | Updated: August 17, 2016 01:11 IST2016-08-17T01:11:04+5:302016-08-17T01:11:04+5:30
जेजुरीतील कुलदैवत खंडोबा मंदिर व गडकोट आवारामध्ये प्रवेश करणाऱ्या भाविकभक्तांची सुरक्षाव्यवस्था केवळ ‘खंडोबाभरोसे’ असल्याचा प्रत्यय पोलीस यंत्रणेला आला.

जेजुरीगडाची सुरक्षाव्यवस्था ‘खंडोबाभरोसे’
जेजुरी : जेजुरीतील कुलदैवत खंडोबा मंदिर व गडकोट आवारामध्ये प्रवेश करणाऱ्या भाविकभक्तांची सुरक्षाव्यवस्था केवळ ‘खंडोबाभरोसे’ असल्याचा प्रत्यय पोलीस यंत्रणेला आला. सुटीच्या दिवसाचा योग साधून सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी गडावरील सुरक्षा यंत्रणेची पाहणी केली. या वेळी त्यांना सुरक्षा यंत्रणेत अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या. या त्रुटी कमी करण्याच्या दृष्टीने त्यांनी सूचना केल्या.
रविवारी तसेच शासकीय सुटीच्या दिवशी भाविकांची देवदर्शनासाठी रीघ लागलेली असते. सध्या श्रावण महिना व सलग तीन दिवस सुट्या आल्याने भाविकांची गर्दी अधिक होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर सुरक्षेबाबत काही तक्रारी आल्याने ही पाहणी करण्यात आली.
गडकोट आवारामध्ये लाखो रुपये खर्च करून ४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ४ महिलांसह २२ सुरक्षारक्षक सेवेत असल्याचे सांगितले जाते. तर, ८ शिपाई आहेत. गडावर प्रवेश करण्यासाठी उत्तर बाजूच्या मुख्य प्रवेशद्वारासह पूर्व व पश्चिम दिशेला असलेल्या मार्गावर डोअर मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत. मात्र, तरीही खिसेकापू व दागिने चोरीच्या घटना सर्रास घडतात. माघपौर्णिमा, चैत्रपौर्णिमा, सोमवती अमावास्या व दसरा या यात्रांव्यतिरिक्त रविवारी व गर्दीच्या वेळी उत्तर दरवाजासह इतर दोन मार्गांवर मेटल डिटेक्टर असले, तरी तेथे कोणीही सुरक्षारक्षक नसतो. वास्तविक, गडकोटांतील तिन्ही मार्गांवर प्रत्येकी एक महिला व एक पुरुष सुरक्षारक्षक हातात मेटल डिटेक्टर घेऊन असायला हवा; मात्र ते दिसून येत नाहीत. पोलीस अधिकारी अथवा वरिष्ठांनी याबाबत विचारणा केली असता जेवणासाठी गेलो होतो अथवा वाट्टेल ती जुजबी कारणे सांगून वेळ मारून नेली जाते. विशेष म्हणजे, हातातील मेटल डिटेक्टर यंत्र चार्जिंग करून घ्यावे लागते, याचेही भान येथील कर्मचाऱ्यांना नव्हते, असे पाहणीच्या वेळी निदर्शनास आले.
पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, उपनिरीक्षक श्रीकांत देव यांनी रविवारी (दि. १४) मंदिराला भेट देऊन पाहणी केली. गडाच्या ३ प्रमुख प्रवेशमार्गांवर डोअर मेटल डिटेक्टरमधूनच भाविकांनी प्रवेश करावा. एक महिला व एक पुरुष सुरक्षारक्षक यांनी हातातील मेटल डिटेक्टरने प्रत्येक भाविकाची तपासणी करून गडाच्या आवारात त्याला प्रवेश द्यावा. उत्तर दिशेकडून प्रवेश देताना देवदर्शन झाल्यानंतर पश्चिम दिशेकडून भाविकांनी बाहेर पडावे. तिन्ही प्रवेशद्वारांवर महिला व पुरुष सुरक्षारक्षक असावेत. हातातील व डोअर मेटलडिटेक्टर यंत्रणेची वेळोवेळी दुरुस्ती करून घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. 'व्हीआयपी' म्हणून आलेल्या मर्जीतील लोकांना खास मंदिरप्रवेशद्वारातून नेऊन देवदर्शन घडविले जाते. तासन् तास लहान मुले घेऊन दर्शनरांगेत उभ्या असलेल्या भाविकांची यामुळे गैरसोय होते. व्यवस्थापनातील कर्मचारी व मंदिरातील सेवेकरी यांना हाताशी धरूनही किंवा विश्वस्तांची ओळख सांगून हा प्रकार सुरू असल्याने गर्दीच्या काळात व्यवस्थापन कोलमडते. (वार्ताहर)