जेजुरीत दरोडा
By Admin | Updated: March 19, 2015 22:53 IST2015-03-19T22:53:32+5:302015-03-19T22:53:32+5:30
जेजुरीमधील विद्यानगर परिसरातील एका घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी तलवार व लोखंडी गजाचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोकड असा पाच लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला.

जेजुरीत दरोडा
जेजुरी : जेजुरीमधील विद्यानगर परिसरातील एका घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी तलवार व लोखंडी गजाचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोकड असा पाच लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला. ही घटना आज पहाटे (दि. १९) पावणेतीनच्या सुमारास घडली.
या प्रकरणी जन्नतुल्ला नुरमहंमद बागवान (रा. विद्यानगर, जेजुरी, मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यानगरमध्ये जेजुरी-दवणेमळा रस्त्याजवळ गेल्या सहा वर्षांपासून बागवान एका इमारतीमध्ये भाडेकरू म्हणून राहतात. त्यांचा भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. काल रात्री १२ वाजता जेवल्यानंतर सर्व कुटुंबीय झोपले होते. मध्यरात्री चार दरोडेखोरांनी घराचा दरवाजा ढकलून तोडला व घरात प्रवेश केला. या वेळी हॉलमध्ये बागवान यांची मोठी मुलगी रेश्मा व नणंद सारजाँहा व भाची समिपा या तिघी झोपल्या होत्या. त्यांना तलवार व कोयत्याचा धाक दाखवून त्या तिघींच्या गळ्यातील चेन, कानातील झुमके, नाकातील चमकी आदी दागिने काढून घेतले.
आतील खोलीमध्ये बागवान त्यांची पत्नी व लहान मुलगी झोपले होते. दोन चोरट्यांनी आत जाऊन झोपलेल्या बागवान यांच्या मानेला तलवार लावली व त्यांची पत्नी जन्नतुल्ला यांना धाक दाखवून कपाटाच्या चाव्या घेतल्या. लूट करून पलायन केले.
चोरटे गेल्यानंतर जन्नतुल्ला यांनी त्यांचे पतीला झोपेतून उठविले. आरडाओरड झाल्यावर आजूबाजूच्या रहिवाशांनी घराची कडी काढली. त्यानंतर पोलिसांना माहिती कळविण्यात आली.भोर उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक भरते, स.पो. निरीक्षक रामदास शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. भर मध्यवस्तीत दरोडा पडल्याने जेजुरीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (वार्ताहर)
४मुलीच्या लग्नासाठी कपाटात ठेवलेले दागिने, अंगावरील दागिने, रोख साठ हजार रुपये व दोन मोबाईल यांची लूट करून चोरट्यांनी पलायन केले. यामध्ये सोन्याचा नेकलेस, मंगळसूत्र, बांगड्या, चेन, झुमके, बाळी यांचा समावेश आहे.
४चोरट्यांनी तोंडाला काळे रुमाल बांधले होते व ते हिंदी व मराठी बोलत होते. चोरटे १० ते १५ मिनिटे घरात होते. चोरट्यांनी बागवान यांच्या घराला व माडीवर असलेल्या घराला बाहेरून कडी घातली होती.