जेईईची तयारी आता एमकेसीएलच्या सेंटरमध्ये

By Admin | Updated: May 20, 2014 21:27 IST2014-05-20T21:23:32+5:302014-05-20T21:27:55+5:30

११, १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी १६ हजार प्रश्नांसह टेस्ट सीरिजची सुविधा

JEE prepares now at MKCL Center | जेईईची तयारी आता एमकेसीएलच्या सेंटरमध्ये

जेईईची तयारी आता एमकेसीएलच्या सेंटरमध्ये

अकोला : अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी जॉइंट एंटरन्स एक्झाम (जेईई) ची तयारी अत्यंत महत्त्वाची असून, विद्यार्थी दहावीनंतरच जेईईच्या तयारीला लागतात. अत्यंत मोजक्या महाविद्यालयात जेईई मेनच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीला प्रवेश मिळत असल्याने यामध्ये राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी एमकेसीएलने ११, १२ वीच्या विद्यार्थ्यांना मास्टरिंग जेईई हा अद्ययावत अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला असल्याची माहिती एमकेसीएलचे विभागीय समन्वयक विवेक देशमुख यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे जेईईसारख्या परीक्षांचा शिकवणी वर्ग लावणे कठीण आहे. त्यामुळे एमकेसीएलने या विद्यार्थ्यांना अत्यंत माफक दरात वर्षभर ऑनलाईन कोचिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जेईई मेनची तयारी महाविद्यालयात, नजीकच्या कॉम्पुटर सेंटरवर किंवा इंटरनेटवर उपलब्ध असल्यास घरबसल्याही करण्याची सुविधा एमकेसीएलने करून दिली आहे. ११ वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम सुरू असतानाच विद्यार्थ्यांना दोन वर्ष सातत्याने मास्टरिंग जेईईचा अभ्यास करता येणार आहे. १२ वीला असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाचे मोड्युल तयार करण्यात आले आहे. प्रत्येक वर्षी २५ आठवड्याच्या या कोर्समध्ये ११ वीच्या ६७ तर १२ वीच्या ७४ टेस्ट घेण्यात येणार आहेत. यासोबतच ११ वीच्या ५९ तर १२ वीच्या ६६ कॉम्बो टेस्ट घेण्यात येणार आहे. फायनल टेस्टमध्ये ११ वीच्या २१ तर १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या २१ टेस्ट घेण्यात येणार आहे. ऑनलाईनसोबतच ऑफलाईनही ही परीक्षा घेण्याची सुविधा राहणार आहे. दोन या टेस्ट सीरिजमुळे विद्यार्थ्यांना ई-टेस्ट आणि मॉकटेस्टद्वारे परीक्षेचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. यासाठी तब्बल १६ हजार प्रश्न उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची ऑनलाईन टेस्ट झाल्यानंतर त्यांना उत्तरे पीडीएफ स्वरूपात मिळणार असून, चुकलेल्या उत्तरांची कारणेही ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना व्हिडिओ लेक्चर्सद्वारे तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार असून, चर्चा करण्यासाठी ब्लॉगही उपलब्ध राहणार असल्याची माहिती विवेक देशमुख यांनी दिली. पत्रकार परिषदेला अमोल सोनोने व जिल्हा समन्वयक अतुल खरोडकार उपस्थित होते.

Web Title: JEE prepares now at MKCL Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.