जयदेव यांचे उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप
By Admin | Updated: July 20, 2016 06:03 IST2016-07-20T06:03:27+5:302016-07-20T06:03:27+5:30
स्मिता ठाकरे यांना राजकारणात पूर्वीपासून रस होता. मात्र, माँसाहेब गेल्यानंतर त्यांना राजकारणाची अधिक ओढ लागली.

जयदेव यांचे उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप
मुंबई : स्मिता ठाकरे यांना राजकारणात पूर्वीपासून रस होता. मात्र, माँसाहेब गेल्यानंतर त्यांना राजकारणाची अधिक ओढ लागली. मात्र, बाळासाहेबांना आणि जयदेव यांना हे पटत नव्हते, असे जयदेव यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीसंदर्भातील उलटतपासणीत सांगितले, तसेच उद्धव ठाकरे यांनी षड्यंत्र करून आपले नाव रेशन कार्डवरून हटवले, असेही जयदेव यांनी उच्च न्यायालयाला सांगितले. जयदेव यांनी उलटतपासणीदरम्यान उद्धव यांच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप केले.
बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीवरून जयदेव व उद्धव यांच्यात वाद सुरू झाला. जयदेव यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्यावरील सुनावणी न्या. गौतम पटेल यांच्यापुढे होती. उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील रोहित कपाडिया यांनी जयदेव यांची उलटतपासणी घेतली. दुसऱ्या दिवशी जयदेव यांना सुमारे ८० प्रश्न विचारण्यात आले.
‘जाहीर सभांमध्ये जवळच्या व्यक्तीवर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करावी लागते. बाळासाहेब त्यांच्या निकटवर्तीयांवर अशीच टीका करायचे आणि रात्री सगळे एकत्र यायचे. हे मला पटत नसल्याने मी राजकारणापासून दूर राहिलो,’ असे जयदेव यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
>उद्धव ठाकरे यांनी षड्यंत्र रचले
उद्धव ठाकरे यांनी माझ्या घरी एका व्यक्तीला माझ्या सह्या घेण्यासाठी पाठवले. त्या व्यक्तीने ‘साहेबां’नी यावर सह्या द्यायला सांगितल्या आहेत, असे सांगितले. मला वाटले, बाळासाहेबांनी सह्या मागितल्या आहेत, म्हणून मी सह्या केल्या. संध्याकाळी बाळासाहेबांना कॉल केला. मात्र, त्यांनी कोणालाच सह्या घेण्यासाठी पाठवले नसल्याचे समजले. बाळासाहेबांनी याचा छडा लावू, असे सांगितले. मात्र, तोपर्यंत उद्धवने माझे नाव रेशन कार्डवरून हटवले होते,’ असे म्हणत जयदेव यांनी उलटतपासणीच्या सलग दुसऱ्या दिवशीही उद्धव ठाकरे यांच्यावर आरोपांचा सपाटा लावला आहे.
>२००३ नंतर उद्धव यांनी ‘मातोश्री’ वर ताबा मिळवण्यास सुरुवात केल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. ‘मातोश्री’ उभारण्यास आपलाही आर्थिक हातभार आहे. बांधकामचे साहित्य पुरवणाऱ्यांना रोख पैसे दिल्याने आपल्याकडे याबाबत कोणतीही पावती नाही, असेही जयदेव यांनी न्या. पटेल यांना सांगितले.