जयंतरावांची नजर ‘कृष्णा’च्या गरम हवेवर
By Admin | Updated: May 15, 2015 00:00 IST2015-05-14T23:40:44+5:302015-05-15T00:00:59+5:30
खेळ्यांना प्रारंभ : गनिमीकाव्याने अंतिम टप्पा गाठण्याची चाल, तिन्ही गटांच्या संपर्कात कार्यकर्ते

जयंतरावांची नजर ‘कृष्णा’च्या गरम हवेवर
अशोक पाटील -इस्लामपूर
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच तिन्ही गटाच्या नेत्यांनी प्रचाराच्या माध्यमातून हवा तापवली आहे. या हवेचा अंदाज माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी घेतला आहे, परंतु आपण त्या रस्त्याला नाहीच, असे ते सांगत आहेत. तथापि त्यांचे कार्यकर्ते मात्र तिन्ही गटातील नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे जयंत पाटील अंतिम टप्प्यात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कारखान्याच्या मागील निवडणुकीत जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी अविनाश मोहिते यांना ताकद दिली होती. जयंत पाटील यांच्याच सांगण्यावरून कार्यकर्त्यांनी ही पाठराखण केली होती. यावेळच्या निवडणुकीत मात्र जयंत पाटील यांनी स्वत:ची भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. असे असले तरी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवेळी संपर्क दौऱ्यात ते ‘कृष्णा’च्या निवडणुकीच्या तापलेल्या हवेचा अंदाज घेत असल्याचे जाणवत होते. सध्या ते यावर भाष्य करण्यास तयार नाहीत, परंतु तिन्ही गटांचे नेते त्यांच्या संपर्कात असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
निवडणुकीच्या रणांगणात उतरायचेच, असा निश्चय करून डॉ. सुरेश भोसले संपर्क दौरा वाढवला आहे. तगडे उमेदवार देण्यासाठी भोसले गट युध्दपातळीवर कामाला लागला आहे, तर डॉ. इंद्रजित मोहिते यांनी वडिलांपासून एकनिष्ठ असलेला गट कायम ठेवत उमेदवारी देताना ज्येष्ठांना संधी देण्याचा विचार केला आहे. अंतिम क्षणी मदनराव मोहिते आणि इंद्रजित मोहिते हेच उमेदवारी निश्चित करणार आहेत. सत्ताधारी अविनाश मोहिते हे मात्र सध्या असलेल्या सवंगड्यांनाच सोबत घेण्याची शक्यता आहे.
या तिघांच्याही हालचालींवर जयंत पाटील यांचे बारीक लक्ष आहे. साखर कारखानदारी सक्षमपणे चालवण्यात जयंत पाटील यांचा हातखंडा आहे. सध्या ते राजारामबापू कारखान्याच्या माध्यमातून चार युनिट चालवत आहेत. चारही ठिकाणी त्यांनी समान ऊसदर दिला आहे. आता त्यांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केल्याने अंतिम टप्प्यात ते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
थंड व्हा!
‘कृष्णा’च्या निवडणुकीकडे कशा पध्दतीने पाहता, या प्रश्नावर जयंत पाटील यांनी, स्वत:जवळची थंड पाण्याची बाटली पुढे करत ‘हे पाणी प्या आणि थंड घ्या’, अशी प्रतिक्रिया देऊन याबाबत बोलणे टाळले.