लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जयंत पाटील यांनी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा होत असताना, विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याविषयी केलेल्या कोटीवरून सभागृहात सोमवारी हास्य उमटले.
बांधकाम आणि अन्य कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचे आणि सुरक्षेसाठीचे किट वितरणाची कामगार विभागाची योजना आहे. याबाबतच्या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील सर्व प्रकारचे लाभ थेट बँक खात्यात जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत. कामगारांना किटऐवजी पैसे दिले, तर ते अधिक चांगल्या वस्तू खरेदी करू शकतील, असे मत व्यक्त केले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जयंतराव यांना अलीकडे पंतप्रधानांच्या योजना आवडू लागल्या, याचे मला समाधान आहे आणि मोदींच्या योजना लागू करण्याचा त्यांचा आग्रह स्वागतार्ह आहे. मुख्यमंत्र्यांनंतर अध्यक्षांनी केलेल्या विधानावरून त्यांनी काही संकेत तर दिले नाहीत ना, अशी चर्चा रंगली व हशा पिकला.
‘उत्तराचा आज अधिकार नाही’तत्पूर्वी जयंत पाटील बोलत असताना, मध्येच कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ‘माझा प्रश्न तर पूर्ण होवू द्या’ असे पाटील म्हणाले.त्यावर, ‘तुम्ही तूर्त प्रश्नच विचारू शकता, उत्तराचा आज तुमच्याकडे अधिकार नाही’, असे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.
प्रमाणपत्र मिळत नसल्याची तक्रारभाजपच्या नमिता मुंदडा यांनी कामगार नोंदणीसाठी कामगार जिथे काम करतात तेथील मालकांचे आणि संबंधित गावाच्या ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र अनिवार्य असते पण ग्रामसेवकांचे आंदोलन सुरू असल्याने हे प्रमाणपत्र मिळत नसल्याची तक्रार यावेळी केली.त्यावर फुंडकर यांनी सांगितले की केवळ आस्थापना मालकाचे ९० दिवस काम केले असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास अशी नोंदणी करवून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.ज्येष्ठ सदस्य विजय वडेट्टीवार यांनी बांधकाम कामगार मंडळाचे सदस्य सचिव वर्षानुवर्षे तेच का आहेत असा प्रश्न केला. त्यावर आधीच्या सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती, असे मंत्री फुंडकर म्हणाले.
किट वाटपात पारदर्शकता बांधकाम आणि इतर क्षेत्रातील कामगारांना सुरक्षा व जीवनोपयोगी वस्तूंच्या किटचे वाटप करण्याच्या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.काँग्रेसचे संजय मेश्राम यांनी या बाबतचा मूळ प्रश्न विचारला होता. आपल्या मतदारसंघात तीन महिलांच्या नावे भलत्याच महिलांनी हे किट घेतले, असा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी चौकशी केली जाईल, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर म्हणाले.