जायकवाडीचे पाणी पेटणार
By Admin | Updated: December 8, 2014 02:29 IST2014-12-08T02:29:06+5:302014-12-08T02:29:06+5:30
भंडारदरा-निळवंडे व मुळा धरणातून जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडण्याच्या निर्णयाला उत्तरेतील

जायकवाडीचे पाणी पेटणार
अहमदनगर : भंडारदरा-निळवंडे व मुळा धरणातून जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडण्याच्या निर्णयाला उत्तरेतील सर्वपक्षीय नेते आणि शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविल्याने आगामी काळात अहमदनगर विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत़
पाणी सोडण्याला विरोध होणार असल्याने सोमवारी भंडारदरा-निळवंडे धरण व प्रवरा नदीपात्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे़ मराठवाड्याचा मुख्य पाणीस्त्रोत असलेल्या जायकवाडी धरणाच्या जलवाहिन्या नगर व नाशिक जिल्ह्यातून जातात़ त्यामुळे उर्ध्व भागात अडविलेल्या पाण्यावर आमचा हक्क असून हे पाणी आम्हाला मिळावे, अशी मागणी मराठवाड्यातून सातत्याने होते. दुसरीकडे नगर जिल्ह्यातही दुष्काळाची परिस्थिती असून जायकवाडीला पाणी सोडणे म्हणजे येथील शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे़ पाणी प्रश्नावरून काही दिवसांपूर्वी उत्तरेतील सहकारी संस्थांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती़ त्यावर जायकवाडीत पाणी सोडण्याच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती देऊन खंडपीठाने आवश्यकता असेल तरच जायकवाडी धरणात पिण्यासाठी पाणी सोडावे, असा निकाल दिला होता़
खंडपीठात त्याचदरम्याम पाण्यासंदर्भात दाखल झालेल्या याचिकांची सुनावणी आता मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे़ प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना ५ डिसेंबरला मराठवाडा विकास महामंडळाने भंडारदरा-निळवंडे व मुळा धरणातून जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडण्याचे आदेश दिल्याने राजकीय संघर्ष पेटला आहे़
भंडारदरा धरणातून ४़३० तर मुळा धरणातून ३़५९ असे एकूण ७़८९ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे़ भंडारदरातून सोमवारी तर मुळा धरणातून मंगळवारी पाणी सोडण्यात येणार आहे़ मात्र, हे पाणी सोडण्यास अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी व नेवासा तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र विरोध केला आहे़ (प्रतिनिधी)