सातारा - एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप झाल्यानंतर मंत्री जयकुमार गोरे वादात अडकले आहेत. या प्रकरणी २०१९ साली कोर्टाने माझी निर्दोष मुक्तता केली असा दावा करत जयकुमार गोरे यांनी विधानसभेत संजय राऊत, रोहित पवार यांच्यावर हक्कभंग आणला. आता या घटनेतील पीडित महिला समोर आली आहे. त्या महिलेने जयकुमार गोरे यांच्यावर खळबळजनक आरोप करत गोरेंनी कोर्टाच्या चेंबरमध्ये माझ्यासमोर दंडवत घातला. पुन्हा असं करणार नाही, मला त्रास देणार नाही असा माफीनामा लिहून दिला म्हणून केस मागे घेतल्याचं महिलेने सांगितले.
पीडित महिलेने माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, २०१९ च्या निवडणुकीत जेव्हा प्रतिज्ञापत्रात माझा खटल्यामुळे जयकुमार गोरे अडचणीत आले तेव्हा त्यांनी माझ्यावर दबाव आणला. आम्ही तुम्हाला जीवे मारू, कुटुंबाला त्रास देऊ अशी धमकी दिली. ऑक्टोबर २०१९ मध्ये हा खटला मागे घेतला. धमकीला घाबरून मी खटला मागे घेतला नाही. जयकुमार गोरे यांनी मला लिखित लिहून दिले. मी पुन्हा असं करणार नाही. कुठलाही त्रास तुम्हाला देणार नाही. मला माफीनामा लिहून दिला. कोर्टाच्या चेंबरमध्ये त्याने अक्षरश: मला दंडवत घातला. मी चुकलो, मला माफ करा असं विनवणी केली. याला एवढी शिक्षा झाली, त्यामुळे हा पुन्हा असं करणार नाही असं मला वाटलं त्यामुळे मी केस मागे घेतली असं तिने सांगितले.
तसेच चांगुलपणाच्या भावनेने मी केस मागे घेतली म्हणून या खटल्यातून जयकुमार गोरे निर्दोष सुटले. नाहीतर या खटल्यात ते निर्दोष सुटले नसते. जर निर्दोष सुटता झाली मग १० दिवस जेलमध्ये का ठेवले, मुंबई उच्च न्यायालयाने तुमचा जामीन अर्ज का फेटाळला, सातारच्या कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला तोही फेटाळला गेला. पोलीस स्टेशनला हजर राहिल्यानंतर जामीन मिळाला. मी तुला सोडून उपकार केले आणि तु मलाच पुन्हा त्रास द्यायला लागला आहे असा आरोपही पीडित महिलेने मंत्री गोरे यांच्यावर केला.
दरम्यान, या प्रकरणात मी त्या महिलेला पुण्यात फ्लॅट दिला, दुबईला फ्लॅट दिला असं गोरे सांगत असल्याचं कानावर आले. ४ महिन्यांपूर्वी मी केलेल्या FIR ची कॉपी व्हॉट्सअपला फिरत होती. ९ जानेवारीला मला एक पत्र आले ते कुणी पाठवलं माहिती नाही. त्या पत्रात २०१६ च्या या प्रकरणाचा उल्लेख होता. मी २६ जानेवारीला उपोषणाला बसणार असं लिहिलं होते, परंतु ते पत्र मी लिहिले नाही, मी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन हे पत्र व्हायरल होतंय हे सांगितले. गोरे यांचे कार्यकर्तेच हे करतायेत. त्यामुळे १७ मार्च २०२५ रोजी मी मुंबई राजभवनासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे असा इशाराही पीडित महिलेने दिला आहे.