लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जनसागर लोटला
By Admin | Updated: November 3, 2014 00:46 IST2014-11-03T00:46:12+5:302014-11-03T00:46:12+5:30
कुटुंबातील व्यक्तीने कर्तृत्वाच्या जोरावर यशाचे शिखर सर केल्यावर त्याच्या स्वागतासाठी जशी घरची मंडळी आपुलकीने अन् जिव्हाळ्याने प्रतीक्षेत उभी राहतात नेमकी हीच भावना उराशी बाळगून

लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जनसागर लोटला
नागपूर: कुटुंबातील व्यक्तीने कर्तृत्वाच्या जोरावर यशाचे शिखर सर केल्यावर त्याच्या स्वागतासाठी जशी घरची मंडळी आपुलकीने अन् जिव्हाळ्याने प्रतीक्षेत उभी राहतात नेमकी हीच भावना उराशी बाळगून नागपूरकर मंडळी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रथम नगरगमनाला स्वागतासाठी रस्त्यावर उभी होती.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच नागपूर नगरीत आलेले विदर्भाचे चौथे आणि नागपूरचे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हजारो नागपूरकरांनी अभूतपूर्व स्वागत केले.
रडायचं नाही लढायचं !
जनतेच्या अपेक्षा खुप आहेत. अनेक कामे करायची आहेत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखविलेल्या मार्गाने राज्य करू, रडायचं नाही तर लढायचं या विचाराने मैदानात उतरू आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करू.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
तरुणाईचा उत्साह
देवेंद्र फडणवीस यांच्या रूपात नागपूरचा एक तरुण राज्याचा मुख्यमंत्री झाल्याचा आनंद शहरातील तरुणांना अधिक झाल्याचे स्वागत मिरवणुकीच्या निमित्ताने दिसून आले. भाजपच्या युवा फळीतील कार्यकर्त्यांसोबतच गैर राजकीय क्षेत्रातील तरुण मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. भाजपच्या तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. आपल्यातीलच एक तरुण मुख्यमंत्री झाल्याची भावना या सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होती. फडणवीस यांचे आगमन दुपारी ४ वाजता होणार होते. मात्र दुपारी २ वाजतापासूनच कार्यकर्त्यांनी विमानतळावर गर्दी केली होती.
स्वखर्चाने प्रवास
मुख्यमंत्री झाल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यातील साधेपणा कायम ठेवला आहे. त्यांनी रविवारी मुंबई-नागपूर विमान प्रवास हा स्वखर्चाने केला. वास्तविक मुख्यमंत्री म्हणून सरकारी विमानाची सेवा त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. त्याचा वापर ते नागपूरला येण्यासाठी करू शकले असते. पण त्याला फाटा देत फडणवीस यांनी खासगी प्रवासी विमान कंपनीच्या विमानाने ‘इकॉनॉमिक क्लास’ मध्ये प्रवास करण्याचा निर्णय घेतला व तिकिटाचा खर्चही स्वत: उचलून एक नवा आदर्श त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या पुढे ठेवला. स्वागत मिरवणुकीत या गोष्टीची चर्चा होती.