जळगाव जिल्ह्यात नागपंचमीच्या दिवशीच सर्पमित्रास सर्पदंश
By Admin | Updated: August 7, 2016 21:46 IST2016-08-07T21:46:57+5:302016-08-07T21:46:57+5:30
भागवत देवराम धनगर (४५, रा. शेंदुर्णी, ता. जामनेर, जि.जळगाव) या सर्पमित्रालाच नागपंचमीच्या दिवशी सापाने दंश केल्याने ते गंभीर जखमी झाले

जळगाव जिल्ह्यात नागपंचमीच्या दिवशीच सर्पमित्रास सर्पदंश
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 7- घरात निघालेल्या सापाला पकडून सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी गेलेले भागवत देवराम धनगर (४५, रा. शेंदुर्णी, ता. जामनेर, जि.जळगाव) या सर्पमित्रालाच नागपंचमीच्या दिवशी सापाने दंश केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या शिवाय आणखी इतर दोघांना आजच सर्पदंश झाल्याच्या घटना जिल्ह्यात वेगवेगळ््या ठिकाणी घडल्या.
शेंदुर्णी येथील भागवत धनगर हे सर्पमित्र असून परिसरात कोठे साप निघाल्यास तेथे जाऊन ते त्याला पकडून सुरक्षित स्थळी हलवितात. अशाच प्रकारे ७ आॅगस्ट रोजी ऐन नागपंचमीच्या दिवशी गावातीलच समाधान रघुनाथ बारी यांच्या घरात सकाळी सहा-साडेवाजेदरम्यान साप निघाला. त्यावेळी धनगर यांना साप पकडण्यासाठी बोलविण्यात आले. तेथे गेल्यानंतर या सर्पमित्राने काठीच्या साहाय्याने साप पकडलाही. मात्र सापाच्या फणा मागे पकडलेले असलेले तो अचानक उलटला व त्याने धनगर यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दंश केला.
साप विषारी असल्याने क्षणातच विष त्यांच्या रक्तात पसरले व त्यांना त्रास जाणवू लागला. त्यावेळी त्यांना तत्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवून उपचार सुरू करण्यात आले. रात्रीपर्यंत त्यांना आॅक्सिजन लावण्यात (व्हेंटीलेटरवर) आले होते.
दरम्यान असोदा, ता. जळगाव येथील रमेश कडू माळी (५७) व आव्हाणे, ता. जळगाव येथील राजेंद्र प्रताप पाटील (४१) या दोघांनाही नागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झाला. त्यांच्यावरदेखील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.