जळगाव नगरपालिका निवडणूक : आघाडी न करण्याचे ‘मातोश्री’वरून आदेश
By Admin | Updated: October 20, 2016 21:39 IST2016-10-20T21:39:24+5:302016-10-20T21:39:24+5:30
जिल्हा परिषद, जिल्हा बँक, दूध संघ तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून आगामी नगरपालिका निवडणूक धनुष्यबाण या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

जळगाव नगरपालिका निवडणूक : आघाडी न करण्याचे ‘मातोश्री’वरून आदेश
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. : जिल्हा परिषद, जिल्हा बँक, दूध संघ तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून आगामी नगरपालिका निवडणूक धनुष्यबाण या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत आघाडी न करण्याचा आदेश मातोश्रीवरून आला आहे. संपर्क प्रमुख दोन दिवस जळगावात आगामी नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर हे २३ व २४ आॅक्टोबर रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. २३ रोजी जळगाव लोकसभा क्षेत्रातील नगरपालिकांमध्ये तर २४ रोजी रावेर लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या नगरपालिकांमध्ये बैठका घेणार आहेत. या दरम्यान स्थानिक उमेदवार व नेत्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. त्यानंतर युती करायची की नाही याबाबतचा अंतिम निर्णय मुंबईत होणार आहे.
जिल्ह्यात पक्षवाढीची संधी गुलाबराव पाटील यांच्या रुपाने जिल्ह्याला मिळालेले मंत्रीपद, माजी आमदार सुरेशदादा जैन यांची जामिनावर मुक्तता यामुळे शिवसेनेमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. माजी आमदार सुरेशदादा यांना मानणारा मोठा गट जिल्ह्यात आहे. तर गुलाबराव पाटील यांच्या मंत्रिपदाच्या माध्यमातून शिवसेना वाढीची संधी आहे. याचा लाभ आगामी नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेकडून घेण्याचा प्रयत्न होणार आहे. महापालिका व चार नगरपालिकेत सत्ता शिवसेनेच्या ताब्यात सध्या धरणगाव, पाचोरा या दोन नगरपालिका आहेत.
एरंडोल नगरपालिका व जळगाव महानगरपालिकेत खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना सत्तेत आहे. चोपडा नगरपालिकेत सर्वपक्षीय सत्ता आहे. त्यात शिवसेनाचा सहभाग आहे. अमळनेर नगरपालिकेचा तिढा कायम अमळनेर नगरपालिकेत सर्वपक्षीय आघाडीचे नियोजन सुरू आहे. तर आमदार शिरीष चौधरी यांनी स्वतंत्र आघाडीची नोंदणी केली आहे. या ठिकाणी सर्वपक्षीय आघाडीमध्ये शिवसेने सहभागी व्हावे असा स्थानिकांचा आग्रह आहे. सहभागी होणार मात्र धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढविणार अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.
त्यामुळे या ठिकाणचा तिढा कायम आहे. विकासकामे प्रचाराचा मुद्दा नगरपालिका क्षेत्रातील विकास कामे तसेच पाचोरा, चोपडा, धरणगाव ग्रामीण या मतदारसंघातील आमदारांची विकासकामे हे शिवसेनेच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे असणार आहे. ज्या नगरपालिकांमध्ये सत्ता नाही त्या ठिकाणी शिवसेनेचे आगामी काळातील विकासाचे व्हिजन हा प्रचाराचा मुद्दा राहणार आहे. शिवसेना सर्व नगरपालिकांमध्ये स्वबळावर आणि धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढविणार आहे. कोणत्याही नगरपालिकेत आघाडी करण्यात येणार नाही. गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख. जळगाव लोकसभा.