जैतापूर होणारच
By Admin | Updated: April 8, 2015 02:50 IST2015-04-08T02:50:49+5:302015-04-08T02:50:49+5:30
जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होणारच, अशी ग्वाही महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली

जैतापूर होणारच
मुंबई : जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होणारच, अशी ग्वाही महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. याबाबत शिवसेनेचे काही वेगळे मत असल्यास तो प्रश्न समन्वयाने सोडवू, असेही खडसे म्हणाले.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावरून आज विधान परिषदेत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. सरकारमधील घटक पक्षानेच जैतापूर प्रकल्पाच्या विरोधात मोर्चा काढला होता. या विषयावर सरकारमध्ये मतभिन्नता असल्याने हा प्रकल्प कसा पूर्ण होणार, असा प्रश्न जयंतराव जाधव यांनी विचारला होता. त्यावर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की या विषयावर सरकारमध्ये मतभेद नाहीत.
या प्रकल्पाकरिता लागणारी ९३८ हेक्टर जमीन २,३३६ शेतकऱ्यांकडून संपादित केली. या प्रकल्पाकरिता जमीन संपादित करून देणे हीच केवळ राज्य सरकारची जबाबदारी असून, प्रकल्प कधी सुरू करायचा हा सर्वस्वी केंद्र सरकारचा निर्णय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या फ्रान्स भेटीत हा प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली असली तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विरोध असल्याचे त्यांनी जाहीर केले असून, शिवसेनेच्या दोन आमदारांनी अलीकडे मोर्चा काढला होता, याकडे सुनील तटकरे यांनी लक्ष वेधले. राज्यपालांच्या अभिभाषणात जैतापूर प्रकल्प पूर्ण करण्यात सरकारचा मोठा सहभाग असेल, असे नमूद केले असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. विरोधी बाकांवरून होत असलेला प्रश्नांचा भडिमार पाहून महसूलमंत्री खडसे हे बावनकुळे यांच्या मदतीला धावून गेले. संपूर्ण देशाला वीजपुरवठा करण्याकरिता उभारण्यात येणारा हा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे ही राज्याची भूमिका आहे, असे सांगत जेव्हा स्वतंत्र पक्ष असतात तेव्हा काही विषयांवर वेगळी भूमिका असते, असा टोला खडसे यांनी लगावला. राज्याच्या पर्यावरणमंत्र्यांनी जैतापूरला पर्यावरणाची मान्यता दिली जाणार नाही, असे निवेदन सभागृहात दिल्याचे आपल्या ऐकीवात नाही, असेही खडसे म्हणाले.
(विशेष प्रतिनिधी)