जैतापूर प्रकल्प पुढील वर्षाअखेर सुरू होणार
By Admin | Updated: April 19, 2017 03:08 IST2017-04-19T03:08:10+5:302017-04-19T03:08:10+5:30
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीचे काम डिसेंबर २०१८ अखेर सुरू होईल, असे फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटीदरम्यान सांगितले.

जैतापूर प्रकल्प पुढील वर्षाअखेर सुरू होणार
मुंबई : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीचे काम डिसेंबर २०१८ अखेर सुरू होईल, असे फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटीदरम्यान सांगितले.
या प्रकल्पाबाबत लोकांच्या मनात काही शंका आहेत आणि त्या दूर करण्यासाठी स्थानिकांशी संवाद साधण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी फ्रान्सच्या शिष्टमंडळाला केले. फुकुशिमासारखी दुर्घटना होऊ नये म्हणून या प्रकल्पाची उभारणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करण्यात आलेली आहे, असे शिष्टमंडळाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले.
फ्रान्सच्या परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय विकासविषयक मंत्रालयाचे सरचिटणीस ख्रिश्चियन मॅस्सेट, फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्झांडर झायग्लेर आणि या प्रकल्पाची उभारणी करणार असलेल्या ईडीएफ कंपनीचे अधिकारी यांचा मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात समावेश होता.
प्रकल्पाची उभारणी करताना सुरक्षिततेसंदर्भात सर्व प्रकारची काळजी घेण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानाला जागतिक पातळीवर मान्यता मिळालेली आहे. ब्रिटनने दोन प्रकल्पांसाठी आमच्यासोबत करार केला आहे, असे शिष्टमंडळाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले.
जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प आधीच्या नियोजनानुसार २०१८ मध्ये पूर्ण होणार होता. तथापि, स्थानिकांनी केलेला विरोध, आधी या प्रकल्पाची उभारणी करणार असलेल्या कंपनीने घेतलेली माघार आदी कारणांमुळे विलंब झाला. (विशेष प्रतिनिधी)