जैतापूरचा झटका कोणाला?

By Admin | Updated: October 8, 2014 23:03 IST2014-10-08T22:23:16+5:302014-10-08T23:03:34+5:30

राजापूर मतदार संघ : प्रकल्पग्रस्त कोणाच्या बाजूने झुकणार हा प्रश्नच

Jaitapur jhat | जैतापूरचा झटका कोणाला?

जैतापूरचा झटका कोणाला?

राजापूर : प्रखर विरोधानंतर केंद्रात सत्ता आल्यानंतरदेखील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करण्यात सेनेला आलेले अपयश, भाजपने त्या प्रकल्पाचे केलेले जाहीर समर्थन, समस्त मच्छीमारांच्या प्रकल्पविरोधी तीव्र भावना असतानादेखील त्यांचे नेते अमजद बोरकर यांनी केलेला भाजप प्रवेश तर आपली मूळ भूमिका कशी योग्य होती ते ठासून सांगण्याचा प्रयत्न करणारी काँग्रेस व राष्ट्रवादी, यामुळे देवाचे गोठणे व सागवे जिल्हा परिषद गटातील मतदार राजा यावेळी कुणाच्या पारड्यात मतदान करणार याला महत्व आले आहे.
देशातील सर्वात मोठा १० हजार मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती करणारा प्रकल्प जैतापूर परिसरात आला असून या प्रकल्पामुळे परिसरातील बागायती, शेती, मच्छीमारीवर विपरीत परिणाम होवून ती नष्ट होतील. या भीतीस्तव स्थानिक जनता मागील काही वर्षे कडाडून संघर्ष करत असून शिवसेनेने याच मुद्द्यावर रान पेटवत अनेक आंदोलन उभारली. त्यामुळे तालुक्यातील दोन्ही जिल्हा परिषद गट सेनेच्या पाठीशी राहिले. त्या बळावर सेनेने अनेक निवडणुकीत बाजी मारत विरोधकांना पराभूत केले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार विनायक राऊत यांना या दोन्ही विभागांनी दणदणीत मताधिक्य दिले. मात्र त्यानंतर चार महिन्याचा कालावधी लोटला तरी शिवसेनेला केंद्रात सत्ता मिळूनही जैतापूर प्रकल्प रद्द करता आलेला नाही, हे वास्तव अधोरेखित ठरले आहे. राज्यात सेना भाजप युती तुटली असली तरी केंद्रातील सत्तेतून शिवसेना अद्याप बाहेर पडलेली नाही आणि प्रकल्पदेखील रद्द झालेला नाही. त्यामुळे इथले मतदार सेनेवर आणखी एक विश्वास दाखवतात का? हा महत्वाचा मुद्दा आहे.
शिवसेनेने आजही प्रकल्प रद्द व्हावा, अशी भूमिका घेतली असतानाच सेनेचा मित्रपक्ष राहिलेल्या भाजपने मात्र केंद्रात सत्ता येताच जैतापूर प्रकल्पाचे समर्थन केल्यामुळे स्वतंत्रपणे लढणाऱ्या भाजपच्या उमेदवाराच्या पाठी इथला मतदार किती रहातो, हे निकालात स्पष्ट होईल. भाजपच्या भूमिकेबाबत मच्छीमारांना काय वाटते, हे १९ आॅक्टोबरला भाजप उमेदवाराला मिळणाऱ्या मतांवरुन स्पष्ट होणार आहे.
युतीमधील सुंदोपसुंदीच्या पार्श्वभूमीवर जैतापुरात प्रकल्प आणणारी काँग्रेस व राष्ट्रवादी मात्र आपली त्यावेळची भूमिका कशी योग्य होती व सेनेने प्रकल्पग्रस्तांना कसे फसवले, ते आता ठासून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर इथला मतदार कोणती भूमिका घेतो त्यावरच प्रत्येक उमेदवाराला मिळणारी मते व विजयाकडे वाटचाल करताना लागणारे मताधिक्य यांची गणिते ठरणार आहेत. (प्रतिनिधी)

भाजपचे प्रकल्पाला समर्थन असतानादेखील साखरीनाटेतील मच्छीमार नेते अमजद बोरकर यांनी रत्नागिरीतील भाजपच्या जाहीर प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यामुळे प्रेरित होऊन आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जैतापूर प्रकल्पाला कडाडून विरोध करणाऱ्या मच्छीमार बांधवांचे नेतृत्व हे बोरकर करतात. केंद्र सरकार प्रकल्पाला समर्थन देत असतानादेखील बोरकर यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.

Web Title: Jaitapur jhat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.