जैतापूरमुळे शिवसेनेची कोंडी पेच : सत्तेत राहायचे की विरोधी भूमिकेत
By Admin | Updated: May 15, 2015 05:00 IST2015-05-15T05:00:33+5:302015-05-15T05:00:33+5:30
कोणत्याही परिस्थितीत जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द केला जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना खासदारांना ठणकावून सांगितल्यामुळे आता जैतापूरच्या गुंत्यातून आपला

जैतापूरमुळे शिवसेनेची कोंडी पेच : सत्तेत राहायचे की विरोधी भूमिकेत
मुंबई : कोणत्याही परिस्थितीत जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द केला जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना खासदारांना ठणकावून सांगितल्यामुळे आता जैतापूरच्या गुंत्यातून आपला पाय कसा सोडवून घ्यायचा असा प्रश्न शिवसेना नेतृत्वाला पडला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यासोबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर बैठक झाली. जैतापूर अणुऊर्जा कराराशी आंतरराष्ट्रीय राजकारण व दोन देशांचे संबंध जोडलेले आहेत. त्याचबरोबर जैतापूर प्रकल्पाकरिता ज्यांच्या जमिनी घेण्यात आल्या त्यांना घसघशीत पॅकेज मिळालेले असल्याने या आंदोलनाला असलेला पाठिंबा कमकुवत झाला आहे. अलीकडेच खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जैतापूरवासीयांचे आंदोलन फ्लॉप झाले होते. त्यामुळे कोकणवासीयांना दिलेले आश्वासन आणि प्रकल्पाबाबत पंतप्रधान मोदींनी घेतलेली ठाम भूमिका अशा कोंडीत शिवसेना सापडली आहे.
जीएसटीमुळे अस्वस्थता
जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पापेक्षा गुडस अँड सर्व्हीसेस टॅक्स (जीएसटी) लागू करण्याचा निर्णय शिवसेनेला अधिक अस्वस्थ करणारा आहे. यामुळे महापालिकेच्या आर्थिक नाड्या केंद्र सरकारच्या हाती जाणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मागील आठवड्यात ठाकरे यांची भेट घेतली व त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही शिवसेनेचे समाधान झालेले नाही.
बाळासाहेब ठाकरे शिवग्राम योजना
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे शिवग्राम योजना सुरु करण्याचा शिवसेनेचा मानस आहे. ज्या गावात वीज पुरवठा होत नाही त्या गावात सौरऊर्जा पुरवणे किंवा ज्या गावात पाणीपुरवठा होत नाही त्या गावात स्वच्छ पाणी पुरवायचे अशी ही योजना आहे. मात्र या योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंजुरी देतात की कसे, याबाबतही साशंकता आहे.
(विशेष प्रतिनिधी)