भारताचीच जीवनतत्त्वे जैन धर्मात
By Admin | Updated: April 9, 2016 03:13 IST2016-04-09T03:13:28+5:302016-04-09T03:13:28+5:30
भारताची देश म्हणून, संस्कृती म्हणून जी जीवनतत्त्वे आहेत तीच जैन धर्मात आहेत.

भारताचीच जीवनतत्त्वे जैन धर्मात
पुणे : भारताची देश म्हणून, संस्कृती म्हणून जी जीवनतत्त्वे आहेत तीच जैन धर्मात आहेत. उपनिषदातील काही तत्त्वे जैन धर्मात तर जैन धर्मातील काही उपनिषदात दिसतात. उद्योग संस्कृतीबरोबरच जीवन संस्कार देणारा हा धर्म आहे. तो तसाच टिकून रहावा म्हणून नव्या पिढीने प्रयत्न करण्याची गरज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांनी शुक्रवारी केले.
जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशन आयोजित ‘जितो-२०१६’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन सकाळी फिरोदिया यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ तसेच उद्योगपती रसिकलाल धरिवाल, ‘जितो’चे विभागीय अध्यक्ष राजेश साकला, पुणे विभागाचे अध्यक्ष विजय भंडारी, उद्योजक तेजराज पुलेचा, राकेश मेहता, धीरज कोठारी, नरेंद्र छाजेड तसेच ‘जितो’च्या विविध विभागांचे अध्यक्ष, नगरसेविका मनिषा चोरबेले, श्रीनाथ भिमाले व्यासपीठावर उपस्थित होते.
फिरोदिया म्हणाले,‘‘नव्या पिढीला व्यापारउदीम शिकवतानाच त्यांच्यावर संस्कार करणेही गरजेचे आहे. जैन धर्माचे वैशिष्ट्यच त्यातील संस्कारात आहे. हे संस्कार टिकवले तर धर्मही टिकणार, धर्म टिकला तर समाज टिकणार, समाज टिकला तर देशही टिकणार. त्यासाठी जैन धर्मियांनी आपल्या मुलांना शिक्षण तर दिलेच पाहिजे शिवाय वागायचे, बोलायचे, रहायचे संस्कारही दिले पाहिजेत.’’ जैन समाजाची प्रगती ही देशाची प्रगती असणार आहे, असे पालकमंत्री बापट म्हणाले. खासदार शिरोळे यांनी समाजासाठी साह्य करण्याचे आश्वासन दिले. आमदार मिसाळ यांनी कशातही साखरेसारखा विरघळून जाणारा,अल्पसंख्य असूनही कर्तृत्वाच्या जोरावर मोठी भरारी मारणारा समाज, अशा शब्दात जैन समाजाचे वर्णन केले. ही परिषद १० एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. (प्रतिनिधी)