जामीन अर्ज फेटाळला, तिवारीबंधूंना अटक ?
By Admin | Updated: July 31, 2016 02:57 IST2016-07-31T02:57:18+5:302016-07-31T02:57:18+5:30
पालघरच्या न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन गुरुवारी येथील न्यायालयाने फेटाळल्याने त्यांच्या अटकेची शक्यता वाढली आहे.

जामीन अर्ज फेटाळला, तिवारीबंधूंना अटक ?
पालघर : पालघरच्या सायकल मार्टचे मालक कमलाकर उर्फ सुरेश पाटील यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आत्महत्येला भोला तिवारी व सुरेंद्र तिवारी यांना जबाबदार धरल्याने त्यांनी अटकेच्या भीतीने पालघरच्या न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन गुरुवारी येथील न्यायालयाने फेटाळल्याने त्यांच्या अटकेची शक्यता वाढली आहे.
आत्महत्या करतांना आपल्या मृत्यूस भोला तिवारी, सुरेंद्र तिवारी, अभिजीत तळवळकर व एक सेवानिवृत्त शिक्षक असे चार जण जबाबदार असल्याचे त्यांनी लिहून ठेवले होते. पैशाच्या देवाणघेवाण संदर्भातला संदेश मोबाईद्वारे पाठविण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने या प्रकरणात वरील दोघांचा सहभाग दिसत असल्याचा अभिप्राय न्यायालयाने नोंदवित त्यांचा जामीन फेटाळला.
पाटील यांच्या आत्महत्येचे प्रकरण अनेक महिन्यांपासून गाजत असून पालघर पोलिसांनी या प्रकरणाबाबत योग्य तपास न केल्याने उच्चन्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढून जिल्हा पोलीस अधीक्षकांना यात गांभीर्याने लक्ष घालण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पालघर स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत आहे. गुरुवारी या दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असला तरी स्थानिक गुन्हेशाखेने या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक केली नसल्याचे पोलीस निरीक्षक होनमाने यांनी सांगितले. त्यामुळे आता न्यायालयाचा मान राखण्यासाठी पोलीस कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)