‘जय’चा शोध नव्याने सुरू
By Admin | Updated: September 27, 2016 01:59 IST2016-09-27T01:59:08+5:302016-09-27T01:59:08+5:30
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून बेपत्ता ‘जय’ नामक वाघाच्या शोधासाठी सोमवारपासून राज्यभरात तीन दिवसांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअनुषंगाने वनांमध्ये वनरक्षक

‘जय’चा शोध नव्याने सुरू
अमरावती : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून बेपत्ता ‘जय’ नामक वाघाच्या शोधासाठी सोमवारपासून राज्यभरात तीन दिवसांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअनुषंगाने वनांमध्ये वनरक्षक, वनपालांंची पायपीट सुरू झाली आहे. याबाबतचा अहवाल बुधवारी वरिष्ठांना सादर केला जाईल.
‘जय’ वाघ गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता असून त्याच्याबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहेत. सोमवारपासून सकाळी ८ ते सायंकाळी ७ या कालावधीत वनांमध्ये ‘जय’चा काही ठावठिकाणा लागतो का, याचा शोध घेतला जात आहे. ‘जय’ हा अन्य ठिकाणी स्थलांतरित झाला असावा, असा अंदाज काही वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. त्याकरिता ही शोधमोहीम नव्याने सुरू झाली आहे.
विदर्भ, खान्देश, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र
आदी भागांतील विस्तीर्ण जंगलात ‘जय’चा शोध घेण्यासाठी संपूर्ण वनविभाग कामाला लागला आहे. (प्रतिनिधी)
वनरक्षक, वनपालांच्या निरीक्षणाअंती येणारा अहवाल उपवनसंरक्षकांना सादर केला जाईल. पुढे हा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाणार असल्याची माहिती आहे. वडाळी, पोहरा जंगलात शोधमोहीम सुरू झाली आहे.
- हरिश्चंद्र पडगव्हाणकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडाळी