राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी जगदाळे, विरोधी पक्षनेतेपदाचा पत्ता कट
By Admin | Updated: March 2, 2017 03:41 IST2017-03-02T03:41:11+5:302017-03-02T03:41:11+5:30
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर सर्व पक्षांनी निवडून आलेल्या नगरसेवकांच्या मोटी बांधायला सुरुवात केली

राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी जगदाळे, विरोधी पक्षनेतेपदाचा पत्ता कट
ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर सर्व पक्षांनी निवडून आलेल्या नगरसेवकांच्या मोटी बांधायला सुरुवात केली आहे. भाजपा आणि शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही निवडणुकीत विजयी झालेल्या ३५ नगरसेवकांचा गट नोंदणी करून घेतला आहे. बुधवारी दुपारी कोकण भवन येथे जाऊन हा गट नोंदणीकृत केला. गटाच्या नेतेपदाची माळ ज्येष्ठ नगसेवक हणमंत जगदाळे यांच्या गळ्यात टाकली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ठाणे महानगरपालिकेची सातवी सार्वत्रिक निवडणूक २१ फेब्रुवारी रोजी पार पडली. या निवडणुकीत ठाणेकरांनी शिवसेनेला बहुमत दिले असून विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एका अपक्षासह ३५ नगरसेवक निवडून आले आहेत. ६ मार्चला ठाणे महानगरपालिकेचा महापौर निवडला जाणार आहे. शिवसेनेकडे सत्ता स्थापनेसाठी ६७ नगरसेवकांचे बहुमत असले, तरी यात दगाफटका होऊ नये, म्हणून सेनेकडून दखल घेतली जात आहे. तशीच राष्ट्रवादीकडून घेतली जात आहे. याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सर्व नगरसेवकांची महत्त्वाची बैठक बुधवारी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतली. ३५ नगरसेवकांचा गट तयार करून त्याच्या नेतेपदाची जबाबदारी जगदाळे यांच्यावर सोपवली आहे. (प्रतिनिधी)
मुंब्य्राला प्रतिनिधित्व
६ मार्चला होणाऱ्या महापौराच्या निवडणुकीत पक्ष मुंब्य्राला प्रतिनिधित्व देणार आहे. जगदाळे यांची गटनेतेपदी वर्णी लागल्याने आता विरोधी पक्षनेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.