ग्रंथदिंडीद्वारे जागर वाचनसंस्कृतीचा
By Admin | Updated: January 29, 2015 23:41 IST2015-01-29T22:56:10+5:302015-01-29T23:41:39+5:30
आठशे विद्यार्थी : घरा-घरांपर्यंत शिक्षणाचा नारा

ग्रंथदिंडीद्वारे जागर वाचनसंस्कृतीचा
कोल्हापूर : सामाजिक प्रबोधनाच्या घोषणा, जनजागृती पथनाट्य, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके करत विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या ५१ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त काढलेल्या ग्रंथदिंडीत चैतन्य आणले. थोर पुरुषांच्या वेशभूषेसह विद्यार्थी, फेटे परिधान केलेली मुले-मुली, नऊवारी साडीतील विद्यार्थिनी या ग्रंथदिंडीचे आकर्षण ठरले.
आज, गुरुवारी सकाळी आठ वाजता कमला कॉलेज येथे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. यावेळी प्र-कुलगुरू अशोक भोईटे, कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, बी.सी.यु.डी. संचालक डॉ. अर्जुन राजगे, ग्रंथदिंडीच्या समन्वयक डॉ. नमिता खोत, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, प्राचार्य डॉ. मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या झांजपथकाच्या गजरात ग्रंथदिंडी सुरू झाली. दिंडीत मुलींचा सहभाग लक्षणीय होता. या मुलींनी काही काळ खांद्यावरून ग्रंथदिंडी वाहिली. विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या डोक्यावरील गांधी टोप्या हे ग्रंथदिंडीचे आकर्षण होते. दिंडी घरा-घरांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचा नारा देत मार्गावरून मार्गस्थ होत होती.
राजारामपुरी येथील माउली चौकात कॉमर्स व न्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छ भारत’ विषयावर पथनाट्य सादर केले. त्यानंतर सायबरमार्गे दिंडी विद्यापीठात आली.
मुख्य इमारतीत कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके करून दाखविली. विद्यापीठातील जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर, ‘वाचनकट्टा’चे समन्वयक युवराज कदम, कमला महाविद्यालयाचे प्रा. अनिल घस्ते यांच्यासह राजाराम महाविद्यालय, कॉमर्स कॉलेज, विवेकानंद कॉलेज, गोखले कॉलेज, के.एम.सी. कॉलेज, न्यू कॉलेज, डी. डी. शिंदे कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे ८०० विद्यार्थी-विद्यार्थिनी या ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
म्हाळसा, खंडोबा...
ग्रंथदिंडीमध्ये कॉमर्स कॉलेजमधील उद्धव बारटक्केने ‘खंडोबा’ची, आकांशा सरनाईकने ‘म्हाळसा’, तर सौरभी मांगलेकरने ‘बानू’ची वेशभूषा केली होती. यासह ‘संत गाडगे महाराज’यांची वेशभूषा विद्यापीठातील कॉमर्स विभागातील सत्यवान करेने, तर ‘समाजशास्त्र’च्या राजेंद्र शेळके यांनी वारकरी वेशभूषा परिधान केली होती हे सर्वजण दिंडीतील आकर्षण ठरत होते.