इस्राईलमध्येही आता मराठीचा जागर

By Admin | Updated: February 16, 2016 01:40 IST2016-02-16T01:40:40+5:302016-02-16T01:40:40+5:30

मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार हा विदेशात व्हावा, या उद्देशाने राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून सोमवारी इस्राईलमधील

The Jagar of Marathi is now also in Israel | इस्राईलमध्येही आता मराठीचा जागर

इस्राईलमध्येही आता मराठीचा जागर

पुणे : मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार हा विदेशात व्हावा, या उद्देशाने राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून सोमवारी इस्राईलमधील तेल-अवीव या विद्यापीठाशी मराठी भाषा शिकविण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.
तेल अवीव विद्यापीठाचे उपाध्यक्ष प्रा. रानान रैन, इस्राईलचे वाणिज्य दूत डेव्हिड अकोव्ह, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख आणि राज्य मराठी विकास संस्थेचे आनंद काटीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तेल-अवीव विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्यामधील झालेल्या सामंजस्य कराराची प्रमुख वैशिष्ट्ये तावडे यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, की अनिवासी भारतीय तसेच भारताबाहेर स्थायिक झालेले भारतीय वंशाच्या लोकांशी सांस्कृतिक वीण घट्ट करून त्यांचा उपयोग व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, कला इ.द्वारे परराष्ट्रसंबंध मजबूत करण्याकडे केंद्रातील मोदी सरकारचा कल आहे. त्याला अनुसरूनच देशोदेशी स्थायिक झालेल्या मराठी भाषिक लोकांच्यात महाराष्ट्राची भाषा, कला, संस्कृती जिवंत राहावी, यासाठी महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक तसेच मराठी भाषा विभाग आग्रही आहे.
इस्राईलच्या मातीत जन्मलेल्या या लोकांच्या पुढच्या पिढ्या मातृभाषा म्हणून हिब्रू बोलतात. इस्रायली विद्यापीठांत संस्कृत, हिंदी तसेच मल्याळम् भाषा शिकण्याची सोय असली तरी मराठी शिकण्याची सोय आजवर उपलब्ध नाही. त्यामुळे देश-विदेशात मराठी भाषेचा प्रचार करणे हे राज्य मराठी विकास संस्थेच्या उद्दिष्टांपैकी एक असल्यामुळे संस्थेने मुंबई विद्यापीठ आणि तेल-अवीव विद्यापीठासह इस्राईलमध्ये प्रायोगिक तत्त्वावर १ महिन्याचा मराठी भाषेचा अभ्यास वर्ग उपलब्ध करून देण्याच्या प्रकल्पात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेचा हा अभ्यासक्रम जून २०१६ पासून इस्राईलमध्ये सुरू करण्यात येईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अन्य देशांतील ज्या शहरांमध्ये मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे, तेथे अशा प्रकारचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही तावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The Jagar of Marathi is now also in Israel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.