इनकमिंगला सामावून घेताय पण...

By Admin | Updated: September 20, 2016 03:54 IST2016-09-20T03:54:54+5:302016-09-20T03:54:54+5:30

निष्ठावंत नाराज असल्याचे चित्र असताना आता तीच परिस्थिती भाजपामधील निष्ठावंतांवरदेखील ओढवण्याची चिन्हे आहेत.

It's getting incomplete but ... | इनकमिंगला सामावून घेताय पण...

इनकमिंगला सामावून घेताय पण...

अजित मांडके,

ठाणे- एकीकडे शिवसेनेत इतर पक्षांतून आलेल्यांना संधी दिली जात असल्याने निष्ठावंत नाराज असल्याचे चित्र असताना आता तीच परिस्थिती भाजपामधील निष्ठावंतांवरदेखील ओढवण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेची ही परंपरा भाजपामध्ये रुजू नये, यासाठी आतापासूनच पक्षातील निष्ठावंतांनी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. इतर पक्षांतील मंडळींना घेतानाच भाजपा निष्ठावंतांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवाव्यात, अशी मागणीच त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून श्रेष्ठींकडे केली.
याची वेळीच दखल घेतली गेली नाही, तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही या मंडळींनी दिला आहे. शिवाय, येत्या काही दिवसांत यासंदर्भातील लेखी निवेदनही मुख्यमंत्र्यांना दिले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
येत्या काही महिन्यांवर ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आल्याने आता सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग आणि आउटगोइंग सुरू झाले आहे. सध्या भाजपाने इतर पक्षांतील अनेकांचे इनकमिंग सुरू केले आहे. त्यामुळे शहरात भाजपा वाढण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, दुसरीकडे पक्षात मागील कित्येक वर्षे तत्त्वनिष्ठा सांभाळून काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मनात मात्र घरघर सुरू झाली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतदेखील भाजपाने इतर पक्षांतून आलेल्यांनाच तिकीट दिल्याने पक्षातील निष्ठावंत नाराज झाले होते. त्यामुळे आता हीच परिस्थिती ठाण्यातही ओढवण्याची चिन्हे निर्माण झाल्याने हे निष्ठावान कार्यकर्ते धास्तावले आहे. त्यातही शिवसेनेचे ठाण्यातील चित्र पाहता, शिवसेनेने निष्ठावंतांना डावलून इतर पक्षांतून आलेल्यांना ज्या पद्धतीने स्थायी समितीपासून ते थेट आमदारकीपर्यंतची संधी दिली, तीच परिस्थिती आपल्यावर ओढवू शकते. यामुळे भाजपामधील या ज्येष्ठांनी आतापासून सावध भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.
>शिवसेनेप्रमाणे आपल्यावरदेखील अन्याय होऊ नये, म्हणून त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. इतर पक्षांतून येणाऱ्यांना पक्षात जरूर घ्या, परंतु पक्षासाठी झटणाऱ्या आणि पक्षाची तत्त्वे सांभाळून काम करणाऱ्या निष्ठावंतांना डावलू नका, असे आवाहन या मंडळींनी श्रेष्ठींकडे केले आहे. याची दखल घेतली नाही, तर मात्र आम्हाला आमचा वेगळा विचार करावाच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Web Title: It's getting incomplete but ...