पॉलिटेक्निकनंतरच आयटीआय प्रवेश?
By Admin | Updated: June 9, 2016 06:09 IST2016-06-09T06:09:23+5:302016-06-09T06:09:23+5:30
आयटीआय प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा विचार सीईटी सेल आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून (डीव्हीईटी) सुरू आहे.

पॉलिटेक्निकनंतरच आयटीआय प्रवेश?
मुंबई : यंदा पॉलिटेक्निक (तंत्रनिकेतन) प्रवेशानंतरच आयटीआय प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा विचार सीईटी सेल आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून (डीव्हीईटी) सुरू आहे. त्यामुळे दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतरही आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. किंबहुना एका आठवड्यानंतर म्हणजेच १६ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती संचालनालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
त्या अधिकाऱ्याने सांगितले की, दहावीच्या निकालानंतर गुणवंत विद्यार्थी पॉलिटेक्निक आणि आयटीआय दोन्हींकडे प्रवेश अर्ज करतात. मात्र त्यांचे प्राधान्य पॉलिटेक्निकला असते. गेल्या तीन वर्षांत आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यात गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रमाणही मोठे आहे. परिणामी पॉलिटेक्निकच्या मेरीट लिस्टनंतर आयटीआयची मेरिट लिस्ट लावली जाण्याची शक्यता त्या अधिकाऱ्याने व्यक्त केली. ज्यामुळे विद्यार्थ्यांनाही अभ्यासक्रम निवडीला प्राधान्य देता येईल.
प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन करायची की आॅफलाइन यावरून प्रशासन अद्याप संभ्रमात आहे. आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात अनेक अडचणी येत असल्यानेच दहावीच्या निकालानंतरही आयटीआय प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. (प्रतिनिधी)