शहरातील माणूस संवेदनशीलता हरवून बसला म्हणणे चुकीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 03:18 IST2016-10-20T03:18:12+5:302016-10-20T03:18:12+5:30
वर्षानुवर्षे गावासाठी काम करणाऱ्यांचा जाणीवपूर्वक केलेला सत्कार म्हणजे सतत गावासाठी काम करणाऱ्यांचे गावाच्या वतीने आभार मानणेच आहे.

शहरातील माणूस संवेदनशीलता हरवून बसला म्हणणे चुकीचे
रोहा : वर्षानुवर्षे गावासाठी काम करणाऱ्यांचा जाणीवपूर्वक केलेला सत्कार म्हणजे सतत गावासाठी काम करणाऱ्यांचे गावाच्या वतीने आभार मानणेच आहे. सन्मानासाठी ती व्यक्तीच कारणीभूत असते असे नाही तर तो प्रातिनिधिक स्वरूपात असतो. नामच्या कामात गावागावातून कुठलीही अपेक्षा न ठेवता, सन्मानाची अपेक्षा न ठेवता काम करणारे खरे हीरो आहेत. सुमारे ५८० कि.मी. खोलीकरण, लांबीकरण व रुंदीकरणाचे काम केवळ दहा कोटीच्या लोकांमधून आलेल्या पैशातून झाले. शहरातील लोकांनी गावासाठी पैसे दिलेले आहेत म्हणूनच शहरातील सगळ्या धकाधकीत माणूस संवेदना हरवून बसलाय असे म्हणणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिने अभिनेते नाना पाटेकर यांनी रोहा येथे केले.
रोहा शहर राष्ट्रवादीच्या वतीने रोहा अष्टमीमधील विविध क्षेत्रातील मान्यवरांना रोहा मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्या प्रसंगी ज्येष्ठ सिने अभिनेते नाना पाटेकर बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे होते. मी अजूनही आईकडे राहतो असं सांगत तिच्या बोलण्यातलं मार्दव जास्त आवडतं. सतत समुद्र लहानपणी समोर दिसला, त्याची गाज, विशालपण, अजस्त्रपण पाहिल्याने कधीही मनात छोटे विचार आले नाहीत, त्यामुळे प्रतिकूल स्थितीतही केवळ अभिनयाचं नाणं खणखणीत असल्याने टिकू शकलो. अमर्यादित काम करायला गेलं की आपण ओव्हर एक्सपोज होतो, समाजासाठी केलेले काम एक्सपोज होणे गरजेचे असते तेवढे आपण फुलत जातो. कितीही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीयपुरस्कार मिळाले तरीही आज नामच्या माध्यमातून काम करताना जे समाधान मिळतेय ते सर्वात जास्त आहे, असे नाना पाटेकर यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या वतीने नाना पाटेकर, आमदार सुनील तटकरे यांना सन्मानपत्र दिले. निखील दाते यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. डॉ. चिंतामणराव देशमुख सभागृहात झालेल्या या कार्यक्र माला दीड हजार रोहेकर उपस्थित होते. (वार्ताहर)
>समाजात संवेदना निर्माण के ली
आमदार सुनील तटकरे यांनी ज्या गावानं मला घडवलं त्या गावाला गाव म्हणून घडवणाऱ्यांचा सन्मान करण्याची ही संधी मिळाल्याचे सांगून नाम संस्थेच्या माध्यमातून समाजाबरोबरच सरकारच्या मनातही संवेदना निर्माण करण्याचे काम नाना पाटेकरांनी केल्याचे सांगितले.
नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत साळुंखे यांनी नाम संस्थेची महती सांगणारी कविता सादर केली.
>पुरस्कार विजेते
कार्यक्र मात किशोर सोमण, गजानन मळेकर, डॉ. नंदकुमार पेंडसे, रवींद्र ढवळे, जाफरखान देशमुख, अहमद नुराजी, कलाब जनाब, अस्मिता सुर्वे, कुमार देशपांडे, मानसी चाफेकर, यशोदा धाटावकर, शैलेश साळुंखे, रमेश गुडेकर, बबन सोलंकी, रजनीकांत शहा, गिंडी काका, रमेश साळवी यांना रोहा मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.