सुशीलकुमार शिंदे यांच्या सत्काराचा कार्यक्रम कोणी करायचा हेच अस्पष्ट
By Admin | Updated: July 21, 2016 20:50 IST2016-07-21T20:50:54+5:302016-07-21T20:50:54+5:30
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून करण्यात येणारा सत्कार कोणी करायचा हे स्पष्ट

सुशीलकुमार शिंदे यांच्या सत्काराचा कार्यक्रम कोणी करायचा हेच अस्पष्ट
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २१ : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून करण्यात येणारा सत्कार कोणी करायचा हे स्पष्ट व्हावे म्हणून महापौर सुशीला आबुटे यांना पत्र दिल्याचा खुलासा आयुक्त विजयकुमार काळम यांनी गुरूवारी केला. या कार्यक्रमाला राष्ट्रपती येणार म्हणून महापालिकेकडे कसलेच पत्र आलेले नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महापालिकेतर्फे मानपत्र देऊन सत्कार करण्याचा सभेने यापूर्वी ठराव केला होता. त्यादृष्टीकोनातून तयारी सुरू झाली आहे. पार्क स्टेडियमवर ४ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम करण्याचे नियोजन आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याहस्ते हा कार्यक्रम होणार असल्याने महापालिकेत तयारीबाबत दोन बैठका झाल्या. जुलै महिन्याच्या सभेकडे या कार्यक्रमासाठी दीड कोटी खर्चाची तरतूद करण्याचा विषय प्रशासनाने पाठविला आहे. यावर माहिती अधिकार मंचाचे विद्याधर दोशी यांनी पत्राद्वारे हरकत घेतली आहे.
या विषयाच्या अनुषंगाने गुरूवारी भापजचे शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी, विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त काळम यांची भेट घेतली. भाजपचे शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांच्या सत्काराचा कार्यक्रम कोणी आयोजित केला, कार्यक्रम पक्षाचा की महापालिकेचा, महापालिकेचा असेल तर सत्काराबाबत शिंदे यांच्याशी प्रशासनाने बोलणी केली आहेत का. कार्यक्रमासाठी महापालिकेच्या तिजोरीतून दीड कोटी खर्च करण्यापेक्षा यानिमित्ताने गौरव विशेषांक काढून त्याच्यातून मिळणाऱ्या जाहिरात व नगरसेवकांच्या मदतीतून हुतात्मा स्मृती मंदिरात हा कार्यक्रम व्हावा अशी भूमिका मांडली.
नगरसेविका रोहिणी तडवळकर, नगरसेवक जगदीश पाटील, काळे, विक्रम देशमुख यांनी शिंदे यांच्या सत्काराला आमचा विरोध नाही. मनपाने ठरावच केलेला आहे. पण मनपाची आर्थिक स्थिती पाहता सत्कारावर इतकी उधळपट्टी नको. जनता आम्हाला जाब विचारणार आहे असे म्हणणे मांडले.
त्यावर आयुक्त काळम यांनी राष्ट्रपतींच्या दौऱ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एक पत्र आले आल्याने आम्ही तयारी सुरू केली आहे. सत्काराबाबत माझ्याकडे कोणतीच अधिकृत माहिती नाही. अमृत महोत्सव सत्कार समितीचे अध्यक्ष डी. वाय. पाटील यांना राष्ट्रपतींच्या दौऱ्याबाबत आलेले पत्र महापौरांनी माझ्याकडे दिले आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रपती दौऱ्यासाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद असावी म्हणून सभेकडे विषय दिला आहे. सर्वांनी चर्चा करून याबाबत निर्णय घ्यावा. या कार्यक्रमाच्या खर्चाबाबत माहितीच्या अधिकारात आलेल्या पत्रात मी हीच भूमिका मांडणार आहे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमृत महोत्सवानिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा तिसऱ्यांदा मानपत्र देऊन सत्कार करण्याचा भावनिक मुद्दा आहे. मनपाची स्थिती नाजूक आहे. दरमहा जप्ती येत आहे. हा सत्कार कोणी करायचा हेच प्रशासनाकडे आलेले नाही.
विजयकुमार काळम, आयुक्त