पक्ष संघटना वाढविणे हीच खरी श्रद्धांजली

By Admin | Updated: February 18, 2015 23:57 IST2015-02-18T21:52:07+5:302015-02-18T23:57:53+5:30

उदय भोसले : सावंतवाडीत राष्ट्रवादीकडून आर. आर. पाटील यांना आदरांजली

It is true tribute to increase party organization | पक्ष संघटना वाढविणे हीच खरी श्रद्धांजली

पक्ष संघटना वाढविणे हीच खरी श्रद्धांजली

सावंतवाडी : गडचिरोलीसारख्या नक्षलवादी जिल्ह्यात आर. आर. पाटील यांनी नक्षलवाद्यांना सुधारले. त्यांच्यातील विष बाजूला करून जिल्ह्यातील गरीब कुटुंबीयांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले होते. त्यांच्या निधनाने देशासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पक्ष संघटना वाढविणे हीच आबांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी केले. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे सोमवारी निधन झाले. त्यांना सावंतवाडी तालुक्याच्यावतीने राष्ट्रवादी कार्यालयात बुधवारी आदरांजली वाहण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष उदय भोसले बोलत होते. यावेळी उपजिल्हाध्यक्ष सत्यप्रकाश गावडे, उपतालुकाध्यक्ष अशोक पवार, सुरेश राऊळ, मंगलदास देसाई, गुरुदत्त कामत, सत्यजित धारणकर, यशवंत जाधव, विजय कदम, भाई भाईप, सतीश नाईक, प्रसाद बर्गे, आदी उपस्थित होते.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वर येऊन त्यांनी राजकारणात यश संपादन केले. यामुळे पैसा हाच पक्षामध्ये सर्वस्व नाही, हे आबांनी दाखवून दिले असल्याचे यावेळी भोसले यांनी सांगितले. गृहमंत्रिपदावर असताना भ्रष्टाचार करीत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या त्यांनी एका दिवसात केल्या होत्या. गनिमी काव्याप्रमाणे त्यांची कामाची पद्धत होती. सामान्य माणसांच्या आलेल्या निवेदनातून तक्रारी अथवा अन्य कामे ते सहज करून सामान्य माणसाला न्याय देत असत. ते राष्ट्रवादीतील महत्त्वाचे रत्न होते, असे यावेळी सुरेश गवस यांनी सांगितले. आर. आर. पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपले व्यक्तिमत्त्व घडवून उपमुख्यमंत्रिपदापर्यंत झेप घेतली. एसएससी परीक्षेदरम्यान त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांची परिस्थितीही गरिबीची होती. यावेळी त्यांनी आपल्या कर्तृत्वावर एसएससीचा टप्पा पूर्ण केला. खूप वाचन केले. जिल्हा परिषद मतदार संघावर ते बावीसाव्या वर्षी निवडून आले आणि तेथून त्यांनी आपली वाटचाल सुरू केली. विधानभवनातही हुशार असे व्यक्तिमत्त्व आबांचे होते, असे सत्यजित धारणकर यांनी सांगितले. आबा पाटील हे सर्वसामान्यांचे नेते होते. आपल्या वक्तृत्व, कर्तृत्व व नेतृत्व याच्या जोरावर ते पुढे आले. त्यांच्या निधनाने सर्व सामाजिक संस्था हळहळल्या. संपूर्ण देशाची हानी झाली. त्यांना कधीही गर्व झाला नाही, असे यावेळी मंगलदास देसाई यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: It is true tribute to increase party organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.