भ्रष्टाचार थांबायलाच हवा
By Admin | Updated: September 3, 2014 01:13 IST2014-09-03T01:13:43+5:302014-09-03T01:13:43+5:30
देश कसा असायला हवा, कोणकोणते नियम असायला हवे, भ्रष्टाचार थांबविणे किती गरजेचे आहे व त्यावरील उपाय काय, यावरील मत ज्येष्ठांनी नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांनी मांडले. निमित्त होते लोकमत कॅम्पस क्लब

भ्रष्टाचार थांबायलाच हवा
निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मांडले मत : स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर : देश कसा असायला हवा, कोणकोणते नियम असायला हवे, भ्रष्टाचार थांबविणे किती गरजेचे आहे व त्यावरील उपाय काय, यावरील मत ज्येष्ठांनी नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांनी मांडले. निमित्त होते लोकमत कॅम्पस क्लब (बाल विकास मंच) व स्व. दौलतराव ढवळे बहुउद्देशीय शिक्षण संस्था प्रस्तुत आंतरशालेय निबंध स्पर्धेचे.
शहरातील १५० शाळांतील हजारो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. ‘मी देशाचा पंतप्रधान झालो तर’, आणि ‘विशुद्ध पर्यावरण एक सामाजिक जबाबदारी’ या दोनपैकी एका विषयावर निबंध लिहायचे होते. यात जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी ‘मी पंतप्रधान झालो...’ या विषयावर आपल्या भावना मोकळ्या केल्या.
त्यांच्या बुद्धीच्या मानाने त्यांनी मांडलेले मत आश्चर्य व्यक्त करणारे आहे, असे स्पर्धेचे परीक्षक रश्मी वाटाणे यांचे म्हणणे आहे. विशुद्ध पर्यावरणासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करायला पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्यांनी किमान एक झाड दत्तक घ्यावे, इंधनाची बचत, आपला परिसर स्वच्छ ठेवणे आदी बाबींवर विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना निबंधाद्वारे उतरविल्या. स्पर्धेचे पुरस्कार वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले.
यावेळी दौलतराव ढवळे शिक्षण संस्थेचे संचालक नरेंद्र ढवळे, मुख्याध्यापिका रश्मी वाटाणे, नीलेश सोनटक्के, श्री सत्यसाई कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका अनुराधा हटवार, उपमुख्याध्यापिका शोभना साहू व इव्हेंट मॅनेजर अमित रोशनखेडे उपस्थित होते.(प्रतिनिधी)
विजेत्या स्पर्धकांची नावे
निंबध स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री सत्यसाई कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी संपदा नीरज देशमाने (५००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह) हिने पटकाविला. द्वितीय क्रमांक विदर्भ बुनियादी हायस्कूलची विद्यार्थिनी श्रुती चिंतामण तिडके (३००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह) हिने तर तृतीय क्रमांक हडस हायस्कूलची विद्यार्थिनी सोनल प्रकाश जोडदंड (२००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह) यांना मिळाला. उत्तेजनार्थ पुरस्कार पं. बच्छराज विद्यालयाची विद्यार्थिनी तनिष्का काकडे, तेजस्विनी विद्या मंदिरची विद्यार्थिनी सृष्टी महिंद्र राडे हिला मिळाला.