मुंबई : राज्यात ‘ब्रेक द चेन अंतर्गंत लावण्यात आलेले निर्बंध १ जूनपासून शिथिल करण्यात आले. औरंगाबाद शहरात देखील सकाळी सात ते २ वाजेपर्यंत सर्व आस्थापना खुल्या करण्याचे जिल्हा प्रशासनाने आदेश दिले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणेच दुसरी लाट थोपवण्यातही प्रशासनाच्या चोख कामगिरीमुळे व जनतेच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळे यश आले. औरंगाबादची एकूण कामगिरी उजवी ठरली व त्यामुळे प्रादुर्भाव कमी झालेल्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला स्थान लाभले. अजूनही रुग्णसंख्या वाढत असलेल्या १८ जिल्ह्यांप्रमाणे औरंगाबादमध्ये लॉकडाऊन वाढवावा लागला नाही, असे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले आहे. (It is indecent to intimidate the Deputy Commissioner of Labor, to trample on law and order - Subhash Desai)
अशात नियम ढाब्यावर बसविणाऱ्या काही व्यापाऱ्यांनी व त्यांच्या समर्थकांनी कामगार उपायुक्तांना धमकावणे व कायदा सुव्यवस्था पायदळी तुडविणे अशोभनीय असल्याचे सांगत जिल्ह्यातील २ लोख ९६ हजार ७५६ दुकाने व आस्थापनांपैकी ८२ आस्थापनांनी शासनाच्या निर्बंधांना झुगारून प्रतिबंधीत कालावधीत आपली दुकाने उघडी ठेवली. ८२ पैकी ४६ प्रकरणाची सुनावणी घेऊन त्यांचे सील उघडण्यास मान्यता दिली. उर्वरित ३६ आस्थपानांची सुनावणी प्रलंबित आहे. त्यांच्यावर टाळेबंदीची कारवाई होणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे उर्वरित ९९ टक्क्यांहून अधिक नियम पाळणाऱ्या व्यापाऱ्यांप्रति आदर व्यक्त करण्यात आला, असे सुभाष देसाई यांनी सांगितले.
याचबरोबर, सर्व मान्यवरांनी नियम व कायदे पाळणाऱ्याचा सन्मान करायचे सोडून कायद्याची पायमल्ली करणाऱ्यांची पाठराखण करावी, हे अनाकलनीय म्हटले पाहिजे. निर्बंध पाळणारे नागरिक व यंत्रणा राबविणारे अधिकारी-कर्मचारी यांच्यामुळेच करोनाची लाट आपण थोपवू शकलो. आणि पुढेही ही एकजूटच आपल्याला सुरक्षित ठेवील, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.