‘संथारा’ची तुलना सती प्रथेशी करणे अयोग्य

By Admin | Updated: August 12, 2015 01:34 IST2015-08-12T01:34:31+5:302015-08-12T01:34:31+5:30

जैन समाजाच्या संथारा व्रत प्रथेची तुलना सती प्रथेशी करणे अयोग्य असल्याचे आचार्य विजयरत्न सूरीश्वर महाराज यांनी मंगळवारी सांगितले. हे व्रत कोणाच्या दबावाखातर

It is inappropriate to compare 'santhara' to a saintly person | ‘संथारा’ची तुलना सती प्रथेशी करणे अयोग्य

‘संथारा’ची तुलना सती प्रथेशी करणे अयोग्य

- अमिताभ श्रीवास्तव,  औरंगाबाद
जैन समाजाच्या संथारा व्रत प्रथेची तुलना सती प्रथेशी करणे अयोग्य असल्याचे आचार्य विजयरत्न सूरीश्वर महाराज यांनी मंगळवारी सांगितले. हे व्रत कोणाच्या दबावाखातर किंवा दु:खामुळे नाही, तर पूर्ण विचाराअंती व सर्वांच्या सहमतीने अंगीकारले जाते, असे ते म्हणाले. राजस्थान उच्च न्यायालयाने अलीकडेच संथारा व्रताची तुलना सती प्रथेशी करणाऱ्या युक्तिवादावरून या व्रतावर बंदी घातली होती.
आचार्य विजयरत्न सूरीश्वर महाराज यांचा मुंबईतील माटुंगा येथे चातुर्मास सुरू असून या दरम्यान लोकमतशी दूरध्वनीवर विशेष
संवाद साधताना ते म्हणाले की, आपण न्यायालयाचा निकाल अद्याप वाचलेला नाही; मात्र संथारा व्रत हे दु:खाच्या स्थितीत उचललेले पाऊल नाही, तर शरीर व आत्म्याच्या नूतनीकरणासाठीची साधना आहे. हे व्रत आरंभताना संपूर्ण कुटुंबाची सहमती घेतली जाते. सर्वांच्या सहमतीनेच निर्णय घेतला जातो. यात लाजिरवाणे असे
काहीही नाही.
संथारा व्रत शरीराला शांत करण्याची प्रक्रिया असून हे व्रत प्रेम आणि उल्हासाने पूर्ण केले जाते. हे व्रत सतीच्या प्रथेप्रमाणे दु:खामुळे किंवा कोणत्याही वयात अंगीकारता येत नाही. मनुष्य पूर्णपणे प्रस्थापित झाल्यानंतर ते अंगीकारले जाते. यात अत्यंत प्रसन्न मनाने ईहलोकीचा त्याग केला जातो. तंदुरुस्त शरीर असलेल्यांना संथारा व्रत अंगीकारण्यास मनाई आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

निर्णयाविरोधात
सुप्रीम कोर्टात जाणार
मुंबई : हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी ‘आॅल इंडिया जैन मायनॉरिटी सेल’च्या कायदा विभागाची मुंबईत बैठक झाली. त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा उहापोह करत निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय झाला.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले की, संथारा व सल्लेखना या परंपरा आत्महत्येशी जोडणे हे संपूर्णत: तर्क विसंगत आहे. या दोन्ही परंपरांमध्ये आहारासह सर्व सुख-सुविधांचा त्याग केला जातो.
त्यागाचे सर्वोत्तम उदाहरण असलेली ही परंपरा जैन समाजातील एक महत्त्वपूर्ण परंपरा आहे. त्यावर केलेला आघात सहन केला जाणार नाही. याविषयी पुढील कार्यवाही तत्काळ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Web Title: It is inappropriate to compare 'santhara' to a saintly person