पत्नीने वारंवार घर सोडून जाणे ही क्रूरताच
By Admin | Updated: January 15, 2017 21:03 IST2017-01-15T21:00:25+5:302017-01-15T21:03:07+5:30
पत्नीने कुणालाही न सांगता सासरचे घर वारंवार सोडून जाणे व अनेक दिवसांपर्यंत बाहेर राहणे ही कृती क्रूरतेच्या

पत्नीने वारंवार घर सोडून जाणे ही क्रूरताच
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 15 - पत्नीने कुणालाही न सांगता सासरचे घर वारंवार सोडून जाणे व अनेक दिवसांपर्यंत बाहेर राहणे ही कृती क्रूरतेच्या व्याख्येत मोडणारी आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात देऊन पतीला घटस्फोट मंजूर केला आहे.
प्रकरणातील पती निखिल व पत्नी भावना हे नागपूर येथील रहिवासी आहेत (दोन्ही नावे काल्पनिक). भावनाला सासरचे घर वारंवार सोडून जाण्याची सवय होती. घर सोडून जाताना ती कुणालाही सांगत नव्हती. ती अनेक दिवस बाहेर राहिल्यानंतर घरी परत येत होती. ती निखिल व सासूसोबत सन्मानाने वागत नव्हती. घरची कामे करीत नव्हती. तिने निखिलचा विरोध असतानाही बँकेतून कर्ज घेऊन व स्वत:चे दागिने विकून ब्युटी पार्लर व मसाज सेंटर सुरू केले होते. तसेच, निखिल व त्याच्या जालना येथील भावाविरुद्ध ते हुंड्यासाठी छळ करीत असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविली होती.
पाणी डोक्यावररून गेल्यानंतर निखिलने भावनाच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी सुरुवातीला कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. कुटुंब न्यायालयाने ३१ आॅगस्ट २०१० रोजी याचिका खारीज केली होती. या निर्णयाविरुद्ध निखिलने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व विनय देशपांडे यांनी वरीलप्रमाणे निर्णय देऊन निखिलचे अपील मंजूर केले व कुटुंब न्यायालयाचा निर्णय रद्द केला. निखिल व भावनाचे ७ मार्च १९९४ रोजी लग्न झाले होते. काही वर्षे दोघेही आनंदात राहिले. त्यानंतर भावनाने वाईट वागायला सुरुवात केली असे निखिलचे म्हणणे होते.