‘मेहनत करून जगणे गुन्हा आहे?’
By Admin | Updated: July 9, 2015 03:09 IST2015-07-09T01:58:24+5:302015-07-09T03:09:17+5:30
मेहनत करून जगणे गुन्हा आहे का असा सवाल विचारत ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत स्वत:ची कैफियत मांडली

‘मेहनत करून जगणे गुन्हा आहे?’
मुंबई : मेहनत करून जगणे गुन्हा आहे का असा सवाल विचारत ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत स्वत:ची कैफियत मांडली. दादासाहेब फाळके चित्रनगरीतील शासनाने भाडेतत्त्वावर करार पद्धतीने दिलेल्या भूखंडावर गायकवाड यांचे हॉटेल आहे; मात्र माफियांच्या घशात घालण्यासाठी करार वाढवला जात नसल्याचे त्यांनी सांगितले. गायकवाड म्हणाले, की ११९४ साली शासनाने उदरनिर्वाहासाठी दिलेल्या भूखंडावर त्यांनी स्वखर्चाने हॉटेल उभारले होते. त्यासाठी लातूर येथील घर आणि जमीनही विकली. या ठिकाणी सुरू असलेल्या हॉटेलमध्ये चित्रनगरीतील कर्मचाऱ्यांना २५ टक्के सवलतीच्या दरात जेवण देत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या बदल्यात शासनाकडून कोणतेही अनुदान घेत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र आता शासन तो भूखंड काढून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. भूखंडाचा करार २०११ साली संपला असला तरीही जून २०१५ पर्यंतचे पाणी आणि जागेचे भाडे भरल्याचे पुरावेही त्यांनी या वेळी दाखवले. यावर प्रशासनातर्फे सह व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांनी न्यायालयाच्या आदेशानुसारच हॉटेल खाली करीत असल्याचे सांगितले. गायकवाड यांच्याकडून करार संपल्यानंतर कोणत्याही कर्मचाऱ्याने भाडे स्वीकारले का, याबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू असेही सांगितले.