एटीएममधून पैसे काढणेही धोकादायक

By Admin | Updated: July 4, 2016 04:44 IST2016-07-04T04:44:51+5:302016-07-04T04:44:51+5:30

एटीएममधून पैसे काढणाऱ्या ३५ खातेदारांच्या खात्यामधील उर्वरित रक्कम ठाणे व मुंबईतील अन्य एटीएम सेंटरमधून काढून घेण्यात आल्याचे उघड झाले.

It is also risky to withdraw money from ATM | एटीएममधून पैसे काढणेही धोकादायक

एटीएममधून पैसे काढणेही धोकादायक


ठाणे : आता एटीएममधून पैसे काढणेही धोक्याचे झाले आहे. पगार जमा झाल्याने शनिवारी कळवा येथील एका बँकेच्या एटीएममधून पैसे काढणाऱ्या ३५ खातेदारांच्या खात्यामधील उर्वरित रक्कम ठाणे व मुंबईतील अन्य एटीएम सेंटरमधून काढून घेण्यात आल्याचे उघड झाले. या खातेदारांचे तब्बल १३ लाख ७९ हजार २५२ रुपये लुबाडण्यात आले. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अद्याप कोणालाही अटक केली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्णिमा शिगवण या महिलेने याबाबत तक्रार दाखल केली असून कळवा येथील एटीएम सेंटरमधून शनिवारी पैसे काढणाऱ्या अन्य ३४ खातेदारांचा अकाउंट बॅलन्स शून्य झाला आहे. स्कीमर या यंत्रणेचा वापर करून अनोळखी भामट्याने पारसिकनगर येथील बँकेच्या एटीएममधून पैसे काढणाऱ्या खातेदारांचे डेबिटकार्ड नंबर व पिन नंबर मिळवले व त्यांच्या खात्यांमधील रोकड परस्पर काढल्याचे बँक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बँकेकडे आतापर्यंत ३५ खातेदारांच्या तक्रारी आल्या असून बँक आणि खातेदारांनी यासंदर्भात २ जुलै रोजी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पारसिकनगर येथील रहिवासी पूर्णिमा शिगवण या कामावर असताना त्यांच्या बचत खात्यातून प्रत्येकी १० हजार रुपये असे १० वेळा पैसे काढून घेतल्याने त्यांना एक लाख रुपयांचा फटका बसला. उर्वरित ३४ जणांचीही पावणेतेरा लाखांची रोकड काढण्यात आली. (प्रतिनिधी)
अशी केली चलाखी
जेव्हा, खातेदार पैसे काढण्याकरिता एटीएमकार्ड मशीनमध्ये टाकतो, तेव्हा लाल रंगाचे दिवे लुकलुकतात. मात्र, शनिवारी जेव्हा हे ३५ खातेदार पैसे काढायला कळव्यातील एटीएममध्ये गेले, तेव्हा एटीएममध्ये कार्ड टाकण्याच्या ठिकाणचे लाल रंगाचे दिवे सतत लुकलुकत होते. काहींना ही बाब खटकली. मात्र, तरीही त्यांनी पैसे काढले व त्यांना फटका बसला. ही बाब त्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणली. त्या एटीएम मशीनच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्कीमरचा वापर केल्याचे बँकेचे म्हणणे असले तरी तसे कोणतेही डिव्हाइस एटीएम मशीनला लावल्याचे मिळाले नाही. त्यामुळे बँकेतील एखाद्या कर्मचाऱ्याने ही ‘चलाखी’ केली का, या दिशेनेही तपास केला जात असल्याचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखी यांनी सांगितले.

Web Title: It is also risky to withdraw money from ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.