मराठवाड्यात पाणी, रोजगाराचा प्रश्न पेटला

By Admin | Updated: March 29, 2016 01:47 IST2016-03-29T01:47:30+5:302016-03-29T01:47:30+5:30

दुष्काळामुळे मराठवाड्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. पाणी व रोजगाराचा प्रश्न बिकट बनला असून सुरळीत पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी निलंगा

The issue of water and employment in Marathwada has risen | मराठवाड्यात पाणी, रोजगाराचा प्रश्न पेटला

मराठवाड्यात पाणी, रोजगाराचा प्रश्न पेटला

लातूर/ उस्मानाबाद : दुष्काळामुळे मराठवाड्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. पाणी व रोजगाराचा प्रश्न बिकट बनला असून सुरळीत पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी निलंगा तालुक्याच्या अंबुलगा (बु.) येथील नागरिकांनी सोमवारी सरपंच व ग्रामसेवकास ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यात नुकसानाच्या भरपाईसाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीने जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला़ मनरेगाची कामे लोकांना मिळत नसल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षाने पंचायत समितीत आत्मदहनाचा प्रयत्न केला.
निलंगा तालुक्याच्या अंबुलगा (बु.) येथे चार कुपनलिकांचे मालक नागरिकांना पाणी देत नाहीत. त्यामुळे त्यांचे अधिग्रहण रद्द करून, नवीन अधिग्रहण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी वारंवार केली. परंतु, त्याकडे सरपंच दुर्लक्ष करीत असल्याने संतापलेल्या महिला व नागरिकांनी सोमवारी ग्रामपंचायतीवर धाव घेतली. टंचाई दूर करण्यासाठी टँकर सुरू करावे, अशी मागणी करीत सरपंच मीना सूर्यवंशी व ग्रामसेवक आर.डी. वाघमारे यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयात अर्धा तास कोंडले. पोलिसांनी गावात धाव घेत अर्र्ध्या तासानंतर या दोघांना बाहेर काढले.
येत्या दोन दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा करू, असे लेखी आश्वासन सरपंच व ग्रामसेवकाकडून मिळल्यानंतरच ग्रामस्थांनी माघार घेतली. (प्रतिनिधी)

गैरसमजुतीतून झालेला प्रकार
सुरेखा माने यांना शासनाकडून एक लाखाची मदत देण्यात आली आहे़ शिवाय खरीप अनुदानापोटी राजेंद्र माने यांच्या नावे प्राप्त असलेले अनुदान १२ हजार ४४४ रूपये त्यांचे अकाऊंट इन आॅपरेटीव असल्यामुळे एनईएफटी रिवर्स झालेली आहे़ त्यामुळे अनुदानात कपात करून कर्ज खात्यावर वर्ग करण्यात आले; या म्हणण्यात तथ्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे़

मनविसे जिल्हाध्यक्षांचा पेटवून घेण्याचा प्रयत्न
लातूर : मनरेगा कामे मजुरांऐवजी यंत्राद्वारे केली जात आहेत. ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊनही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मनविसेचे जिल्हाध्यक्ष निलेश भंडे यांनी सोमवारी पंचायत समितीच्या बैठकीत अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

विहिरीत पडून गंभीर जखमी
अहमदपूर तालुक्यातील देवकरा गावानजीक पाणी काढताना वाहिरीत पडून ज्ञानोबा पंडित मुरकुटे (४५) गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्यांना लातुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शेतकरी पत्नीने रॉकेल ओतून घेतले
उस्मानाबाद : नुकसानीपोटी प्राप्त झालेले अनुदान कर्जखात्यात वर्ग केल्याचा आरोप करीत मंगरूळ (ताक़ळंब जि़उस्मानाबाद) येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीने जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला़
मंगरूळ येथील राजेंद्र महादेव माने या शेतकऱ्याने २४ आॅक्टोबर २०१५ रोजी नापिकी आणि कर्जाच्या डोंगरामुळे आत्महत्या केली आहे़ त्यांनतर त्यांची पत्नी सुरेखा यांना शासनाकडून एक लाखाची मदत मिळाली़ हे अनुदान पतीच्या नावे बँकेत जमा झाले होते़ मात्र, ही रक्कम बँकेने पतीच्या कर्जखात्यात कपात करून घेतलीे़ त्यामुळे सुरेखा माने यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पोर्चमध्ये अंगावर रॉकेल ओतून घेतले़ घटनेनंतर पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन आनंदनगर ठाण्यात नेले़

Web Title: The issue of water and employment in Marathwada has risen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.