हवेतच विरला बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाचा मुद्दा

By Admin | Updated: July 13, 2014 21:32 IST2014-07-13T20:19:32+5:302014-07-13T21:32:58+5:30

वर्ष २0१२ मध्ये झाला होता ६ बस स्थानकांच्या पुर्नबांधणीचा निर्णय

The issue of modernization of rare bus stations in the area | हवेतच विरला बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाचा मुद्दा

हवेतच विरला बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाचा मुद्दा

अकोला : राज्य परिवहन महामंडळाचे केंद्रीय अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी आर्थिक वर्ष २0११-१२ मध्ये 'बांधा वापरा व हस्तांतरित करा' (बीओटी) या तत्त्वावर नाशिकसह औरंगाबाद, अकोला, कर्‍हाड, रत्नागिरी व पनवेल बसस्थानकाचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला. प्रारंभी नाशिक बसस्थानकाचा कायापालट करण्यात आला. त्यानंतर उर्वरित पाचही बसस्थानकांचे आधुनिकीकरण करणे अपेक्षित असताना, विकासाच्या दृष्टिकोनातून घेण्यात आलेला हा निर्णय हवेतच विरला असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यातील सर्वच जिल्हा स्तरांवर असलेल्या बसस्थानकांचा कायापालट करण्याचा राज्य परिवहन महामंडळाचा मानस आहे. प्रवाशांना अत्याधुनिक सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून नाशिकसह औरंगाबाद, अकोला, कर्‍हाड, रत्नागिरी व पनवेल येथील मध्यवर्ती बसस्थानकांचे बीओटी तत्त्वावर आधुनिकीकरण करण्याचा निर्णय रापमचे केंद्रीय अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्यानुसार प्रारंभी नाशिकच्या बसस्थानकाचे रूपडे बदलण्यात आले. यानंतर औरंगाबाद, अकोला, कर्‍हाड, रत्नागिरी आणि पनवेल येथील मध्यवर्ती बसस्थानकांचे आधुनिकीकरण करणे अपेक्षित होते. यासाठी आलेल्या कंत्राटदारांच्या प्रस्तावांना हिरवी झेंडी न मिळाल्याने या पाचही प्रमुख बसस्थानकांच्या आधुनिकीकरणाचा मुद्दा हवेतच विरला असल्याचे स्पष्ट होत आहे. रापमचे सदस्य टी. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ७ मार्च १९८0 रोजी अकोल्याचे तत्कालीन नगराध्यक्ष दे. मा. कराळे यांच्या हस्ते मध्यवर्ती बसस्थानकाचे उद्घाटन पार पडले. बसस्थानकाच्या निर्मितीला ३५ वर्ष पूर्ण झाले आहेत. बसस्थानकाच्या अनेक भागांची रचना ही पुन्हा नव्याने होणे सध्या गरजेचे आहे. मात्र, २0१२ मध्ये आधुनिकीकरणासाठी घेण्यात आलेल्या निर्णयामुळे या ठिकाणी कुठलेच नवीन बांधकाम करता येत नसल्याने येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांकरिता बसस्थानकाची इमारत धोकादायक सिद्ध ठरू लागली आहे. गतवर्षी पाऊस अधिक झाल्याने बसस्थानकाच्या सिलिंगचे अनेक ठिकाणी पोपडे पडले होते. १९८0 च्या मानाने आजच्या घडीला वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. बसस्थानकावर येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांची संख्या आणि बसेसची संख्या यात मोठय़ा प्रमाण वाढ झाली आहे. शहर वाहतुकीलादेखील अडथळय़ाच्या ठरणार्‍या अकोल्यातील मध्यवर्ती बसस्थानकाचे आधुनिकीकरण करणे काळाची गरज आहे. वर्ष २0१२ मध्ये बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाच्या निर्णयाची पुनर्समीक्षा करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे स्थानिक अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

Web Title: The issue of modernization of rare bus stations in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.