इस्लामी नववर्ष हिजरी सन १४३९ ला आज संध्याकाळपासून प्रारंभ होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 14:49 IST2017-09-21T14:31:18+5:302017-09-21T14:49:21+5:30
इस्लामी कालगणनेच्या हिजरी सन १४३९ला आज संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता आहे. हिजरी सन १४३८चा अखेरचा उर्दू महिना ‘जिलहिज्जा’ची २९ तारीख असल्याने संध्याकाळी चंद्रदर्शन घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

इस्लामी नववर्ष हिजरी सन १४३९ ला आज संध्याकाळपासून प्रारंभ होणार
नाशिक : इस्लामी कालगणनेच्या हिजरी सन १४३९ला आज संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता आहे. हिजरी सन १४३८चा अखेरचा उर्दू महिना ‘जिलहिज्जा’ची २९ तारीख असल्याने संध्याकाळी चंद्रदर्शन घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ढगाळ हवामान नसल्यास चंद्रदर्शन घडू शकते. चंद्रदर्शनाची ग्वाही प्राप्त झाल्यास सायंकाळपासून मुस्लीम बांधवांचा हिजरी सन १४३९ या नववर्षाला प्रारंभ होईल. चंद्रदर्शनाची नाशिक विभागातून ग्वाही चांद समितीला प्राप्त न झाल्यास चालू महिन्याचे तीस दिवस पूर्ण केले जातील. इस्लामी कालगणनेचा पहिला महिना म्हणून ‘मुहर्रमुल हराम’ ओळखला जातो. हा महिना धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या प्रिय कन्या हजरत फातिमा यांचे पुत्र शहीद हजरत इमाम-ए-हूसेन यांच्या स्मृतींना उजाळा देतो. मुहर्रमचे पहिले दहा दिवस मुस्लीम बांधवांकडून ठिकठिकाणी इमाम-ए-हुसेन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘यादे शहिदे करबला’ या प्रवचनमालांचे आयोजन केले जाते. नाशिकमध्येही जुने नाशिक, वडाळागाव, वडाळारोड, सातपूर, देवळाली कॅम्प आदि परिसरांमध्ये दहा दिवसीय प्रवचनमालांचे विविध धार्मिक सामाजिक संघटनांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. मुहर्रमच्या दहा तारखेला मुस्लीम बांधवांकडून ‘आशुरा’चा दिवस पाळला जातो. या दिवशी इमाम-ए-हुसेन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विशेष नमाजपठण फातिहापठण व सरबतचे सामुहिकरित्या वाटप केले जाते. काही शहरांमध्ये ताबूतांची मिरवणूक काढण्याचीही पारंपरिक प्रथा आहे; मात्र या पारंपरिक प्रथेला धार्मिक शास्त्रानुसार कुठलाही आधार नसल्याचे धर्मगुरूंकडून दहा दिवसीय प्रवचनमालांमध्ये सांगितले जाते. ताबूताच्या पारंपरिक प्रथेविरुध्द समाजाचे प्रबोधन धर्मशास्त्राच्या आधारे करण्याचा मुस्लीम धर्मगुरूंकडून केला जातो.
‘इमामशाही’मध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्याचे घडते दर्शन
जुन्या नाशिकमधील सारडा सर्कल येथील हजरत सय्यद इमामशहा बाबा यांचा दर्गा ‘इमामशाही’ नावाने ओळखला जातो. या दर्ग्यात दरवर्षी मुहर्रम महिन्याच्या आठ ते दहा तारखेपर्यंत उत्सव साजरा केला जातो. अळीवच्या बियांपासून येथील सय्यद कुटुंबिय पारंपरिक प्रथेनुसार हिरवळीचा ताबूत तयार करतात. दहा दिवस या ताबूतासाठी मेहनत घेऊन त्यावर हिरवळ फुलविण्याचा प्रयत्न केला जातो. हा ताबूत मानाचा असल्याची अख्यायिका आहे. मुहर्रमच्या दहाव्या दिवशी दर्गाच्या परिसरात या ताबूताचे खांदेकरी म्हणून हिंदू कोळी बांधवांना मान दिला जातो. हा मान मागील शेकडो वर्षांपासूनचा आहे. शेकडो वर्षे जुन्या या पारंपरिक प्रथेमधून आजही हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन दरवर्षी घडते.