‘इसिस’ने अपहरण केल्याचा बनाव!

By Admin | Updated: August 7, 2016 02:28 IST2016-08-07T02:28:16+5:302016-08-07T02:28:16+5:30

चांगली नोकरी कर, तू स्वत:च्या पायावर कधी उभा राहणार, अशा घरच्यांकडून होणाऱ्या प्रश्नांनी हैराण झालेल्या गुजरातमधील एका तरुणाने पलायन करीत मुंबई

'Isis' kidnapped! | ‘इसिस’ने अपहरण केल्याचा बनाव!

‘इसिस’ने अपहरण केल्याचा बनाव!

मुंबई : चांगली नोकरी कर, तू स्वत:च्या पायावर कधी उभा राहणार, अशा घरच्यांकडून होणाऱ्या प्रश्नांनी हैराण झालेल्या गुजरातमधील एका तरुणाने पलायन करीत मुंबई गाठली. मात्र येथेही नातेवाइकांकडून त्याबाबत विचारणा होऊ लागल्याने त्याने आपले ‘इसिस’च्या अतिरेक्यांनी अपहरण केल्याची थाप मारीत कुटुंबीयांना घाबरवून सोडले. मात्र पोलीस तपासात त्याचा बनाव उघड झाला आणि ताडदेव पोलिसांनी त्याला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.
गुजरातमधील अनुज उपाध्याय हा २२ वर्षांचा तरुण काही काम करीत नसल्याने घरातील मंडळी त्याला सतत कामधंदा कर, चांगली नोकरी शोध, असे सांगत होती. मात्र काम करण्याची इच्छा नसलेल्या अनुजने २५ जुलैला थेट मुंबई गाठली. त्यापूर्वी त्याने चुलत भाऊ अंकितला थोडी कल्पना देऊन याबाबत घरात कोणालाही न सांगण्याची सूचना केली होती. मुंबईत तो एका नातेवाइकांकडे राहिला. मात्र त्यांनीही विचारपूस सुरू केल्याने अनुज तेथूनही बाहेर पडला. दोन दिवस भटकल्यानंतर त्याला घरची आठवण येऊ लागली. मात्र घरी गेल्यानंतर ते रागावतील, या भीतीने त्याने अंकितच्या मोबाइलवर मेसेज पाठवला. त्यात त्याने ‘आपण ‘इसीस’चे अतिरेकी असून अनुजचे अपहरण केले आहे. अंधेरी येथे डांबून ठेवलेल्या अनुजला चार दिवसांत ठार मारू’, असे नमूद केले.
हा मेसेज वाचून घाबरलेल्या अंकितने घरच्यांना ही बाब सांगितली. त्यांनी तातडीने मुंबई पोलिसांशी संपर्क साधला. त्याची शोधमोहीम सुरू असताना अनुजने भावाला पुन्हा मेसेज करून अतिरेक्यांच्या तावडीतून माझी सुटका करून घेतली असून अंधेरीत थांबल्याचे कळविले. दरम्यान, त्याच्या नातेवाइकांनी त्याला नालासोपारा येथे येण्यास सांगितले असता तो टाळाटाळ करू लागला. दरम्यान, पोलिसांनी मोबाइलवरून ठिकाण शोधत त्याला ताडदेव येथून ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)

मोबाइलवरून सापडला ठावठिकाणा
पोलिसांनी अनुज उपाध्यायकडे चौकशी केली असता अपहरणाचे बिंग फुटले. घरच्यांच्या भीतीमुळे अपहरणाचा बनाव केल्याची कबुली दिली. अनुज व त्याच्या नातेवाइकांना योग्य सूचना देत त्यांच्या ताब्यात देण्यात आले, असे पोलीस उपायुक्त प्रवीण पडवळ यांनी सांगितले.
ताडदेव येथे भटकणाऱ्या अनुजला त्याच्या मोबाइल लोकेशनवरून शोध घेत पोलिसांनी ताब्यात घेतले.

Web Title: 'Isis' kidnapped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.