रत्नागिरी - सध्या आरोप करायचे आणि राजीनामा मागायचा असा प्रकार सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान कुठे रचलं जातंय का अशी शंका माझ्या मनात आहे असं सांगत शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी मोठा आरोप केला आहे. या प्रकरणाशी खोलाशी जावे लागेल असंही कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर म्हटलं.
रत्नागिरीतील कार्यक्रमात रामदास कदम म्हणाले की, मी उघडपणे बोलणारा माणूस आहे. मंत्र्यांवर होणाऱ्या आरोपामागे नेमकं काय आहे याचा शोध घेतला पाहिजे. आम्ही जनसेवा ही ईश्वरसेवा या भावनेतून आतापर्यंत काम केले आहे. काँग्रेससोबत जे गेले त्यांच्या निष्ठेच्या विष्ठा झाल्या. तुम्ही कशाला एकनाथ शिंदे यांच्या नावाने बोंबलता. मातोश्रीवर एबी फॉर्मचा सौदा केला जातो. कोण तो अनिल परब? सभागृहात ३५ ची नोटीस दिल्याशिवाय कुणावरही आरोप करता येत नाही हा नियम आहे. सभापतींना आदल्यादिवशी सर्व कागदपत्रे दिल्याशिवाय, त्यांच्या परवानगीशिवाय आरोप करता येत नाहीत. मग हे मॅनेज कसे झाले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तसेच एखादा सभागृहात उपस्थित नसेल तर त्याच्याबाबत सभागृहात बोलता येत नाही मग आरोप कसे झाले, हे कुठे मॅनेज झाले? मी हे प्रकरण सोडणार नाही. आम्ही उभ्या आयुष्यात अंगाला डाग लावून घेतला नाही. कसले डान्स बार, डान्सबार चालवणारी आमची औकात नाही आम्ही लोकांचे संसार उद्ध्वस्त करत नाही तर लोकांचे संसार उभे करतो. ही आमची औलाद आहे. चालवायला दिलेल्या एखाद्या माणसाने चूक केली असेल तर ते कळल्यावर ताबडतोब त्याला बाहेर काढले. सगळे परवाने काढून घेतले ही नीतीमत्ता आमच्याकडे आहे. कसले राजीनामे मागता असं सांगत डान्सबार प्रकरणी योगेश कदम यांच्यावर होणाऱ्या आरोपावर रामदास कदमांनी भाष्य केले.
दरम्यान, योगेशने खेड तालुक्यात अनेक विकासात्मक बदल केले. काहींना हे सहन होत नसल्याने त्याच्यावर टीका करत आहेत. पण आपला फोकस हा विकास असून त्यापासून ढळू नकोस, तुझ्यावर कुणी आरोप केले त्याच्या मुळाशी आपण जाऊ पण तुझ्या मागे हा एकनाथ शिंदे ठामपणे उभा आहे असं सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी योगेश कदम यांच्या पाठीशी असल्याचे भाषणातून स्पष्ट केले.