वारे आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे

By Admin | Updated: January 25, 2015 01:04 IST2015-01-25T01:04:36+5:302015-01-25T01:04:36+5:30

स्थिरस्थावर होऊ लागलेले फडणवीस यांचे सरकार नवी विटी, नवे राज्य या म्हणीला अनुसरून लवकरच आपल्या पसंतीच्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्याच्या पदांवर नेमेल,

IPS officers transfers | वारे आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे

वारे आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे

डिप्पी वांकाणी - मुंबई
स्थिरस्थावर होऊ लागलेले फडणवीस यांचे सरकार नवी विटी, नवे राज्य या म्हणीला अनुसरून लवकरच आपल्या पसंतीच्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्याच्या पदांवर नेमेल, याची जोरदार चर्चा आयपीएसच्या गोटात सुरू झाली आहे. साधारणपणे मुख्यमंत्री दावोसहून परतल्यानंतर फेब्रुवारीत बऱ्याच बदल्या होतील, असा अंदाज एका ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. अर्थात या बदल्यांमध्ये पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त आणि सह-आयुक्त (गुन्हे) यांचा समावेश नसेल, अशी अटकळ खात्रीशीरपणे व्यक्त होत आहे.
राज्य सुरक्षा महामंडळाचे महासंचालक के. पी. रघुवंशी फेब्रुवारी अखेरीस निवृत्त होतील. त्यामुळे ते पद रिक्त होईल. त्याखेरीज महासंचालकाच्या समकक्ष दर्जाचे आणखी एक पद सीआयडी (गुन्हे) किंवा तुरुंग विभागासाठी नव्याने निर्माण करण्याचा सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. हा विचार कृतीत आला, तर रघुवंशी निवृत्त होतील तेव्हा बदली-बढतीसाठी महासंचालक दर्जाची दोन पदे उपलब्ध असतील. म्हणजेच अतिरिक्त महासंचालक पदावर असलेल्यांपैकी दोघांना बढतीची संधी मिळू शकते. पण त्याऐवजी मुंबईच्या आयुक्तांनाच महासंचालकाचा दर्जा देण्याचा पर्यायही सरकारसाठी खुला आहे. यापूर्वी एम. एन. सिंग यांनी महासंचालकाच्या दर्जावर मुंबईचे आयुक्तपद भूषविले होते. सध्याचे आयुक्त राकेश मारिया अतिरिक्त महासंचालक दर्जाचे अधिकारी आहेत.
आयुक्तपदावरील मारियांची कारकीर्द नावे ठेवायला जागा नाही, अशी राहिली असल्याने तूर्तास तरी त्यांना अन्यत्र कोठे पाठविण्याचा विचार सरकारला अग्रक्रमाने करावा लागेल, अशी स्थिती नाही. सह-आयुक्त सदानंद दाते यांचे काम आणि प्रतिमा यांचा विचार केल्यास त्यांच्याही बदलीचा विषय चर्चेला येण्याचे कारण नाही. पण एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दाते यांनी स्वत:च केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्यात स्वारस्य दाखविले आहे. त्यामुळे प्रतिनियुक्तीच्या प्रतीक्षा यादीत त्यांचे नाव आहे.
प्राप्त परिस्थितीत आयुक्त अणि सह-आयुक्तांची बदली करायचीच असा चंग फडणवीस यांच्या अखत्यारीतील गृह विभागाने बांधलाच तर या पदांवर कोण येऊ शकते, याच्याही अटकळींना वेग आला आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार आयुक्तपदासाठी झालाच तर के. एल. प्रसाद, मीरा बोरवणकर आणि के. के. पाठक यांचा विचार होऊ शकतो. तर सह-आयुक्त पदासाठी धनंजय कमलाकर किंवा देवेन भारती यांचा विचार होऊ शकतो.

सरकारची इच्छा काहीही असली, तरी विद्यमान महासंचालक संजीव दयाळ याच पदावर राहतील. त्यांचा दर्जा आणि पगार यामुळे त्यांना अन्यत्र हलविणे किंवा त्यांच्या जागी अन्य कोणाला आणणे शक्य नाही. दयाळ यांचा सध्याचा पगार राज्याच्या पोलीस सेवेतील सर्वोच्च-कमाल श्रेणीत आहे.

नियमानुसार या श्रेणीत एकच अधिकारी असू शकतो. त्यामुळे दयाळ यांच्या जागी अन्य अधिकाऱ्याची नियुक्ती करावयाची झाल्यास राज्य मंत्रिमंडळाला या श्रेणीतील आणखी एक पद निर्माण करण्याच्या सुधारणेला मंजुरी द्यावी लागेल.

Web Title: IPS officers transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.