महात्मा गांधींच्या पुतळा अनावरणास उपराष्ट्रपती नायडू यांना निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 16:00 IST2021-08-12T15:26:34+5:302021-08-12T16:00:59+5:30
दर्डा यांनी मंगळवारी उपराष्ट्रपतींची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन यवतमाळमधील विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली.

महात्मा गांधींच्या पुतळा अनावरणास उपराष्ट्रपती नायडू यांना निमंत्रण
विकास झाडे -
नवी दिल्ली : महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण याशिवाय वीणादेवी दर्डा डे बोर्डिंग स्कूल व जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलचे लोकार्पण करण्यासाठी यवतमाळला यावे यासाठीचे निमंत्रण लोकमत समूहाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना दिले आहे. नायडू यांनी होकार दर्शविला असून येत्या काही दिवसांमध्ये तारीख निश्चित होईल.
दर्डा यांनी मंगळवारी उपराष्ट्रपतींची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन यवतमाळमधील विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली. यवतमाळ येथील हनुमान आखाडा हे स्वातंत्र्याच्या लढ्यातील एक महत्त्वाचे केंद्र होते. स्वातंत्र्य लढ्यातील अनेक नेत्यांनी या आखाड्याला भेट दिली. त्यात सुभाषचंद्र बोस, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वि. दा. सावरकर, महात्मा गांधी आदींचा समावेश होता. गांधीजींनी या भेटीत ‘मै इस आखाडेकी उन्नती चाहता हूॅँ’, असे आखाड्याच्या नोंदवहीत लिहून ठेवले होते. या आखाड्याला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत; परंतु कोरोनामुळे इथे कोणतेही कार्यक्रम राबविता आले नाहीत. मात्र, आखाडा व्यवस्थापनाने गांधीजी लिहीत आहेत, असा ९ फुटांचा ब्रॉन्झचा पुतळा सुप्रसिद्ध शिल्पकार पद्मश्री राम सुतार यांच्याकडून तयार केला आहे. या पुतळ्याचे अनावरण करावे, अशी विनंती दर्डा यांनी उपराष्ट्रपतींना केली आहे.
अत्याधुनिक बोर्डिंग स्कूल
- यवतमाळला ३० कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक श्रीमती वीणादेवी दर्डा डे बोर्डिंग स्कूल बांधण्यात आले आहे.
- त्याचप्रमाणे हिंदी हायस्कूल यवतमाळ येथे जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलचे लोकार्पण करण्याची विनंती उपराष्ट्रपतींना करण्यात आली.
- यावेळी विजय दर्डा यांनी लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी लिहिलेले ‘माझी भिंत’ हे पुस्तक उपराष्ट्रपतींना दिले.