पर्ल्सविरोधात गुंतवणूकदारांचा मोर्चा
By Admin | Updated: December 11, 2015 01:56 IST2015-12-11T01:56:26+5:302015-12-11T01:56:26+5:30
राज्यातील १ कोटी गुंतवणूकदारांसह देशातील ५ कोटी नागरिकांना गंडा घालणाऱ्या पर्ल्स कंपनीविरोधात गुंतवणूकदारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

पर्ल्सविरोधात गुंतवणूकदारांचा मोर्चा
मुंबई : राज्यातील १ कोटी गुंतवणूकदारांसह देशातील ५ कोटी नागरिकांना गंडा घालणाऱ्या पर्ल्स कंपनीविरोधात गुंतवणूकदारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वित्त व्यवहारांचे नियंत्रण करणाऱ्या सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड इंडियाने (सेबी) कंपनीविरोधात जप्तीची कारवाई करण्याची मागणी करत, अखिल भारतीय पीएसीएल (पर्ल्स) गुंतवणूकदार संघटनेने १५ डिसेंबरला आझाद मैदानावर धडक मोर्चाची हाक दिली आहे.
संघटनेचे निमंत्रक विश्वास उटगी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, १२ आॅगस्ट २०१५ रोजी सेबीने कंपनीला सर्व गुंतवणूकदारांचे पैसे ४५ दिवसांत परत करण्याचे आदेश दिले होते. १२० दिवस उलटूनही कंपनीने पैसे परत केले नाहीत, असा संघटनेचा आरोप आहे.
कंपनीने देशातील ६ कोटी गुंतवणूकदारांचे सुमारे ४९ हजार १०० कोटी रुपये चक्रानुवर्ती गुंतवणूक योजनांमध्ये बुडवले आहेत. या संदर्भात सेबीने कारवाई करताना, ४५ दिवसांत पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. सोबतच कंपनीला ७ हजार २६९ कोटी ५० लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. मात्र, कंपनीने यापैकी कोणत्याही आदेशाचे पालन
केले नसल्याचे उटगी यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)