औंध : बालेवाडीत पार्क्स एक्स्प्रेस प्राईडमध्येच सुरू असलेल्या कामात तेराव्या मजल्यावरून पडून एका मजुराचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले. बालेवाडी येथे शुक्रवारी इमारतीचा स्लॅब कोसळून ९ मजूर मृत्युमुखी पडल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पालकमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या वेळी आमदार मेधा कुलकर्णी सोबत होत्या. शुक्रवारी घडलेल्या घटनेची चौकशी केली जाईल. दोषींची गय केली जाणार नाही, असे सांगितले. या वेळी परिसरातील नागरिकांनी गेल्या आठवड्यात याच इमारतीत घडलेल्या अपघाताची माहिती बापट यांनी दिली. त्याची चौकशी करण्याचे आदेश बापट यांनी सहायक पोलीस आयुक्त वैशाली जाधव-माने यांना दिले. आमदार मेधा कुलकर्णी यांनी या इमारतीला बेसमेंट, पार्किंग व त्यावर ११ मजल्यांची परवानगी असताना बांधकाम व्यावसायिकाने बाराव्या मजल्याचे अनधिकृत बांधकाम चालू ठेवले. याबाबत दोषी बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना निलंबित करावे. प्रकरणातील सर्व बांधकाम व्यावसायिकांची विविध ठिकाणी चालू असलेली सर्व बांधकामे थांबविण्याचे आदेश देण्यात यावेत. मृत कामगारांच्या नातेवाइकांना मदत म्हणून बांधकाम व्यावसायिकाने प्रत्येकी दहा लाख रुपये द्यावेत, अशी मागणी केली.या वेळी महापालिका आयुक्त कुणाल कुमार, संदीप कदम, वैशाली जाधव-माने, कोथरुड विधानसभा भाजपाध्यक्ष प्रकाश बालवडकर, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस अमोल बालवडकर, प्रल्हाद सायकर, सागर बालवडकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)>बांधकाम मजुरांच्या सुरक्षेबात आवाज उठविणारशहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत आहेत. मात्र, मजुरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. याविरोधात विधिमंडळात आवाज उठविणार असल्याचे आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. गोऱ्हे यांनी शनिवारी सकाळी बालेवाडीतील दुर्घटनास्थळी भेट दिली. या वेळी पांडुरंग बालवडकर, राम गायकवाड, जिल्हा उपप्रमुख स्वाती ढमाले, सागर बालवडक र उपस्थित होते. त्या म्हणाल्या, ‘‘यांनी महापालिका प्रशासनावर आता जनतेचा विश्वास राहिला नाही.’’ पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मार्फत पुणे शहर व उपनगरातील सर्व अनधिकृत बांधकामांची चौकशी करून कठोर कारवाई करावी. राज्य शासनाने सर्व मृत व्यक्तींच्या नातेवाइकांना १० लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी गोऱ्हे यांनी केली. >फ्लॅट ताब्यात देण्यास विलंबदुर्घटना घडलेल्या पार्क्स एक्स्प्रेस इमारतीत फ्लॅट खरेदी केलेल्या अनेक नागरिकांनी पालकमंत्री गिरीश बापट व आमदार मेधा कुलकर्णी यांची भेट घेतली. करारानुसार फ्लॅटचा ताबा मिळण्यास ६ महिन्यांचा विलंब झाला आहे. आता या दुर्घटनेमुळे आणखीच अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे वेळेत ताबा मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे साकडे त्यांनी घातले.
मजुराच्या मृत्यूची चौकशी करणार
By admin | Updated: July 31, 2016 01:00 IST