संक्रमण शिबिरातील घुसखोरांनी थकविले कोट्यवधींचे भाडे

By Admin | Updated: September 20, 2015 00:17 IST2015-09-20T00:17:40+5:302015-09-20T00:17:40+5:30

संक्रमण शिबिरांमधील घुसखोरांना बाहेर काढणे अशक्यप्राय झाल्यामुळे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) त्यांच्याकडून भाडे वसूल करण्याचा निर्णय घेतला.

Intruders rent the tired billions in the transit camp | संक्रमण शिबिरातील घुसखोरांनी थकविले कोट्यवधींचे भाडे

संक्रमण शिबिरातील घुसखोरांनी थकविले कोट्यवधींचे भाडे

मुंबई : संक्रमण शिबिरांमधील घुसखोरांना बाहेर काढणे अशक्यप्राय झाल्यामुळे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) त्यांच्याकडून भाडे वसूल करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गेल्या चार वर्षांपासून बहुतांश घुसखोरांनी अद्यापपर्यंत भाडे भरलेले नाही. घुसखोरांकडे कोट्यवधी रुपये थकीत असतानाही म्हाडाने त्यांच्याकडून भाडे वसुली करण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या मुंबई आणि उपनगरातील संक्रमण शिबिरात १८ हजार ३५४ खोल्या आहेत. यापैकी सुमारे साडेनऊ हजार घरांमध्ये घुसखोरी झाली आहे. सेस प्राप्त इमारतींचा पुनर्विकास करताना तेथील रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात संक्रमण शिबिरामध्ये पाठविण्यात येते. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून अनेक रहिवाशांना हक्काचे घर मिळालेले नाही. हे रहिवासी संक्रमण शिबिरात खितपत पडले असतानाच अनेकांनी विविध संक्रमण शिबिरांमध्ये घुसखोरी केली आहे.
या रहिवाशांकडून भाडे वसूल करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यानुसार पात्र रहिवाशांकडून ५00 रुपये तर घुसखोरांकडून ३ हजार रुपये वसूल करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. हा निर्णय होऊन सुमारे पाच वर्षांचा कालावधी लोटला तरी बहुतांश घुसखोरांनी म्हाडाने निश्चित केलेले भाडे भरलेले नाही. भाडे वसूल करण्यासाठी म्हाडाने विशेष मोहीमही राबविली. मात्र, घुसखोरांनी त्याला दाद दिलेली नाही.
भाडे न भरताच घुसखोर संक्रमण शिबिरात राहत असताना त्यांच्यावर कारवाई करण्याकडे म्हाडाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे घुसखोरांवर कोणाचाच वचक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Intruders rent the tired billions in the transit camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.